कागलला सौर उर्जा प्रकल्प उभारणार  - हसन मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

"" जयसिंगराव तलावाच्या परिसरात सौर उर्जा प्रकल्प उभा करण्याचे नियोजन सुरु आहे. पालिकेला लागणाऱ्या वीजेइतकी वीज या प्रकल्पातून निर्माण होईल. पालिकेच्या वीजेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. '' 
हसन मुश्रीफ. आमदार 

कागल - नाविण्यपूर्ण योजनेतून कागल नगरपालिका सौर उर्जा प्रकल्प उभारणार आहे. यातून निर्माण होणारी वीज महावितरण कंपनीला विकण्यात येणार आहे. असा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविणारी कागल ही राज्यातील पहिली "क 'वर्ग पालिका ठरणार आहे. दोन वर्षात शहरासह उपनगरातील सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. लिंगायत समाज दफनभूमी लोकार्पण कार्यक्रमानंतर शहरातील विकासकामांविषयी ते पत्रकारांशी बोलत होते. 

ते म्हणाले, शहरात पिण्याच्या पाण्याच्या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. शहरासह उपनगरात खुदाई करुन पाईपलाईन टाकली आहे. सुमारे साठ किलोमीटर पाईपलाईन आहे. तीन ठिकाणी पाण्याच्या टाक्‍या उभारल्या. लक्ष्मी टेकडीवर उभारलेल्या पाण्याच्या टाकीमुळे महामार्गाच्या पश्‍चिम बाजूस असलेल्या उपनगरांना सायफन पध्दतीने पाणी मिळणार आहे. पाईपलाईनच्या कामामुळे रस्ते उकरले आहेत. तीन कोटी रुपये निधी मिळाला. 15 नोव्हेंबर नंतर शहरासह अखिलेश पार्क, समर्थ कॉलनी, गहिनीनाथ नगर, अनंत रोटो आदी उपनगरातील रस्ते डांबरीकरण व सिमेंटीकरण करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात शाहू कॉलनी, जयसिंगराव पार्क, यशिला पार्क या ठिकाणी रस्ते डांबरीकरण करण्यात येणार आहे. 

ते म्हणाले, यशवंत किल्ला येथे खुले नाट्यगृह रद्द करुन पालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी मल्टिपर्पज हॉल उभारण्यात येणार आहे. बाजार पेठेतील महात्मा फुले मार्केट पाडून त्या ठिकाणी पार्किंग व मार्केट करण्यात येणार आहे. शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. पाझर तलाव, जयसिंगराव तलाव, यशवंत किल्ला व शाहू उद्यान या ठिकाणी ओपन जीम उभारण्यात येणार आहे. ख्रिश्‍चन दफनभूमी संरक्षक भिंतीचा प्रश्‍न सोडविला आहे असे त्यांनी सांगितले. 

यावेळी प्रताप उर्फ भैय्या माने, रमेश माळी, संजय चितारी उपस्थित होते. 

Web Title: kagal news hasan mushrif Solar energy