कागल संघ, ‘आनंद’ थकबाकीदार

कागल संघ, ‘आनंद’ थकबाकीदार

कोल्हापूर - शेतकरी सहकारी संघात आजी-माजी संचालक आणि त्यांच्या नातेवाइकांच्या नावावर  १६ लाख २९ हजारांची थकबाकी असल्याचे अध्यक्ष अमरसिंह माने यांनाही मान्य करावे लागले. काही वेळा माल उधारीवर दिला जातो. पण, त्याची वेळेत परतफेडही केली पाहिजे, असेही माने यांनी मान्य केले. 

दरम्यान, यापैकी संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर यांचे चिरंजीव भारत पाटील यांनी ६८ हजार रुपयांच्या उधारीची परतफेड केली आहे. उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचेही श्री. माने यांनी सांगितले. संचालक आणि व्यवस्थापक मंडळाच्या बैठकीतही आज थकबाकी वसुलीबाबत जोरदार चर्चा झाली.

शेतकरी संघाला गतवैभव द्यायचे, असे जाहीर भाषणात सांगणारे काही संचालकच उधारी वेळेत परत देत नाहीत. शिरोळ शाखेतील अपहाराची चौकशी आणि वसुलीचे काम कौतुकास्पदरित्या सुरू आहे. मात्र, या ठिकाणी संचालकांनीच आपआपल्या संस्थांना बळकटी देण्यासाठी शेतकरी संघाचा वापर करत राहिल्यामुळे संघाला उभारी मिळणार कशी, असा सवाल केला जात आहे. दरम्यान, आज संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीमध्येही थकीत कर्ज तत्काळ भरण्याबाबत चर्चा झाल्याचे अध्यक्ष माने यांनी सांगितले.

१०० रुपयांचे बंधपत्र
एखाद्याला वैयक्तिक आणि संघासाठी म्हणून खत, डिझेल, पेट्रोल क्रेडिटवर दिले तर ६० दिवसांत परतफेड करावी लागते. दरम्यान, त्यासाठी आता १०० रुपयांच्या बंधपत्रावर जबाबदारी लिहून घेतली जाते. त्यामुळे शक्‍यतो जास्त दिवस उधारी राहत नाही. ज्यांची एकूण १६ लाखांची उधारी आता दिसत आहे, त्यांच्याकडून वसूल केली जाईल, असेही माने यांनी सांगितले.

संघाकडून खत, डिझेल किंवा इतर कृषी उपयोगी साहित्य उधारीवर दिले जाते. ६० दिवस मुदतही दिलेली आहे. दरम्यान, कागल, मल्लिकार्जुन संस्था, काशीनाथ मगदूम, संजय पाटील, आनंद भात, भारत पाटील यांच्याकडून १६ लाख रुपयांची वसुली सुरू आहे. भारत पाटील यांनी ६८ हजार रुपये आज भरले. 
- अमरसिंह माने, 

अध्यक्ष, शेतकरी सहकारी संघ

थकबाकीदार    थकीत रक्कम    या तारखेपासून थकीत    थकीत कालावधी
कागल तालुका खरेदी-विक्री संघ    १० लाख ५६ हजार      मार्च २०१७     १ वर्ष २ महिने   
मल्लिकार्जुन संस्था कसबा सांगाव    १ लाख ५८ हजार     जानेवारी २०१७     १ वर्ष १ महिना   
काशीनाथ मगदूम    ८१ हजार    जुलै २०१७     १ वर्ष १ महिना   
संजय बाळासाहेब पाटील    १ लाख  ३ हजार     जानेवारी २०१७     १ वर्ष 
आनंद भात खरेदी-विक्री संघ    १ लाख ३६ हजार     जून २०१६     २ वर्ष १ महिना
भारत बी. पाटील    ६८ हजार    मे २०१८     ८ महिने
एकूण    १६ लाख २९ हजार     -        -        
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com