उन्हाळ्यातील दिवाळी ‘काजवा प्रकाशोत्सव’

सम्राट अ. केरकर
मंगळवार, 23 मे 2017

राधानगरी अभयारण्यामध्ये २६ मे रोजी बायसन नेचर क्‍लब राधानगरीच्या वतीने ‘काजवा प्रकाशोत्सव’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काजव्याच्या शास्त्रीय माहितीपासून प्रत्यक्ष काजव्यांचे दर्शन दिले जाणार आहे. सोबतीला मार्गदर्शक असणार आहेत. यानिमित्त काजव्यांचे पर्यावरणीय महत्त्व, त्याच्या प्रकाशाची अनुभती याबद्दल.... 

राधानगरी अभयारण्यामध्ये २६ मे रोजी बायसन नेचर क्‍लब राधानगरीच्या वतीने ‘काजवा प्रकाशोत्सव’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काजव्याच्या शास्त्रीय माहितीपासून प्रत्यक्ष काजव्यांचे दर्शन दिले जाणार आहे. सोबतीला मार्गदर्शक असणार आहेत. यानिमित्त काजव्यांचे पर्यावरणीय महत्त्व, त्याच्या प्रकाशाची अनुभती याबद्दल.... 

मार्चनंतर हळूहळू उन्हाळ्याचे दिवस सुरू होतात आणि आपण उष्णता असह्य होऊ लागल्यामुळे शहरातून गावाकडे थोड्या थंड वातावरणात जाण्यासाठी सुटीचे प्लॅन करू लागतो. या वेळी मे महिन्यामध्ये एखादी दुसरी वळवाची सर बरसून गेली की पश्‍चिम घाटातील जंगल परिसरामध्ये सुरू होतो एक जीवनक्रम.... या जीवाचे आयुष्य पण जेमतेम एक ते दीड महिना. या थोड्याशा काळात पण आपल्या सर्वांना एक आनंदमय, उत्साही ऊर्जा देतो, तो हा जीव म्हणजे ‘काजवा.’

माणूस प्राणी प्रथम निसर्गात निसर्गासोबत राहायचा तेव्हा तो आनंदी होता. पण जसा जसा तो प्रगती करू लागला, तसा निसर्गालाच ओरबाडून खाऊ लागला. धावपळीत स्वतःचे मानसिक स्वास्थ्य, शांतता हरवून बसला. आजकाल नवीन पिढीला वेगवेगळ्या लाईटस्‌, प्रखर प्रकाशझोत पाडणारे विविध प्रकार माहीत झाले आहेत. त्यांना अंधार कधी दिसलाच नाही; पण निसर्गातील अंधारी रात्री आपल्या शरीरातून मंद प्रकाश सोडून सर्वांना मोहित करणारा ‘काजवा’ माहितच नाही.

आजकाल मुलांना असा कीटक असतो हे सांगितले तरी पटत नाही. काजवा म्हणजे नक्की काय, याची उत्सुकता लागून राहते. काजवा म्हणजे एक प्रकाशणारा कीटक आहे. त्याला सहा पाय आणि पंखाच्या दोन जोड्या असतात. तो हवेत उडू पण शकतो. काजव्याच्या शरीराचे मुख्यत्वे ३ विभाग असतात. अंडी त्यानंतर अळी, कोश असा पुलपाखरांसारखा जीवनक्रम असणाऱ्या काजव्याच्या अळीचे दोन आठवड्यात प्रौढ रूपात रूपांतर होते. प्रौढ झाल्यानंतर काजवा स्वयंप्रकाशी बनतो. काजवा हा मऊ ओलसर जागी असलेले गोगलगायसारखे खाद्य खातो; तर बेडूक, कोळी, विविध पक्ष्यांचे आवडते खाद्य असतो.

काजव्याच्या शेपटीत एक अवयव असा असतो, ज्यामध्ये ल्युसिफेरीन नावाचं एक केमिकल असत. या केमिकलशी ऑक्‍सिजनशी विक्रिया झाली की त्यामधून प्रकाश बाहेर पडतो. या प्रकाशात आणि विजेच्या दिव्याच्या प्रकाशात एक मूलभूत फरक आहे, तो म्हणजे विजेचा प्रकाश उष्णता निर्माण करतो. पण काजव्याचा प्रकाश उष्ण नसतो, तर थंड असतो.

मे महिन्याच्या मध्यापासून जून महिन्यापर्यंतचे दिवस हे काजव्यांचे प्रजनन करण्याचे दिवस असतात. आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी काजवे प्रकाशाने चमचमत असतात.

नर आणि मादीच्या मिलनानंतर नराचा जीवनक्रम संपतो. त्याची निसर्गातील भूमिका संपते. मादी अंडी देऊन जीवनक्रम संपवते. सुरवातीला कमी संख्येने दिसणारे काजवे जून महिन्याच्या उत्तरार्धापर्यंत असंख्य होतात. असा आकर्षित करणारा काजवा आपल्या कमी दिवसाच्या जीवनचक्रामध्ये अगणीत आनंद, उत्साह देऊन जातो.
हा काजवा कुठे पाहावा आणि कसा पाहावा, याबद्दल आपण बरेचजण अनभिज्ञ आहोत; पण सध्या हा काजवा तुम्हाला पश्‍चिम घाटातील सर्व रस्ते, गावे, जंगलामध्ये दिसू शकतो. 

काजवे स्वयंप्रकाशित आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टॉर्च किंवा गाडीचे प्रखर वीज (लाईटस्‌) फेकू नये.

काजव्यांची ही रात्र खूपच रोमॅंटीक असते. म्हणून अनेक नवदांपत्य या प्रकाशोत्सवाची वाट पहात असतात. लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत प्रत्येक जण हा प्रकाशोत्सव उघड्या डोळ्यांनी अनुभवू शकतो. म्हणूनच अनेक कवी, गीतकार, दिग्दर्शकांना या काजव्यांच्या रात्रीने भुरळ पाडली आहे. 

अशा या अनोख्या ‘काजवा प्रकाशोत्सवा’चा आयुष्यात एकदा तरी अनुभव घ्यावा.
बायसन नेचर क्‍लबतर्फे दरवर्षी वेगवेगळ्या महोत्सवांचे आयोजन करून राधानगरी परिसरात पर्यटनवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील जंगलामध्ये पहिला फुलपाखरू महोत्सव घेऊन महाराष्ट्रातील फुलपाखरू पर्यटनाला एक नवीन दिशा दिली आहे. ‘वनदुर्गा महोत्सव’ वन्यजीव सप्ताह, साहसी खेळ आदींचे आयोजन आजपर्यंत करण्यात आले आहे. 

भविष्यामध्ये राधानगरी परिसरामधील ‘देवराई परिक्रमा महोत्सव’, ‘सर्प महोत्सव’, ‘शेकरू महोत्सव’ असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

बायसनचे ध्येय 
‘सकाळ’ माध्यम समूहामार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक स्वच्छता मोहिमेत बायसनचे सर्व कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेतात. जंगल वाचविणे, वन्य प्राणी वाचवणे व पर्यटन वृद्धींतून राधानगरी परिसराचा विकास करणे हे संस्थेचे ध्येय आहे.

Web Title: Kajwa Festival