भिंत भक्कम, आतून पोखरलेली

भिंत भक्कम, आतून पोखरलेली

कोल्हापूर - असे म्हणतात की तुरूंगातला ‘अंडा बरॅक’ म्हणून जो भाग असतो. तेथे सुर्यप्रकाशही दबकतच प्रवेश करतो. अंडा बरॅक म्हणजे तेथे फक्त अंधुक प्रकाश असलेली खोली त्यासमोर जाळी आणि त्यात फक्‍त एकटा खतरनाक आरोपी. या आरोपीवर नजर ठेवण्यासाठी रखवालदार आणि २४ तास सीसीटीव्हीची नजर. आरोपी बसला, उठला तरी ते सीसीटीव्हीतून सुटणे अशक्‍य.

अशा परिस्थितीत अंडा बरॅकमधील कैद्यांकडे चक्क पिस्तूल, मोबाईल आणि आरोपीच्या हातात पिस्तूल असलेली क्‍लिप मोबाईलवरून व्हायरल होण्याची घटना म्हणजे कळंबा कारागृहाची ‘भक्कम’ भिंत आतून किती पोखरली आहे, याचीच प्रचिती देणारी ठरली आहे. कारागृहाची सुरक्षा यंत्रणा किती खरी किती खोटी यांचा पंचनामाच करण्याची वेळ या घटनेमुळे आली आहे. 

कारागृहात प्रवेश करताना प्रत्येकाची झडती घेण्याचा नियम आहे. झडती केवळ कैद्याचीच नव्हे तर ड्युटीवर येणाऱ्या प्रत्येक जेल पोलिसांची घेतली जाते. कारागृहाच्या आवारात मोबाईल, शस्त्र, गांजा, दारू किंवा इतर कोणतीही वस्तू नेण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा ठरतो. पण आज व्हायरल झालेल्या क्‍लिपने कारागृहाचे सर्व नियम कैद्याने केवळ गुंडाळलेच नाही तर कारागृहाचे हे नियम किती तकलादू आहेत हेही दाखवून दिले. 

कैद्याने पिस्तूल, मोबाईल कारागृहात आणून जरूर गुन्हा केला आहे. पण हे सगळे आत येईपर्यंत कारागृहाचे अधिकारी, पोलिस काय करत होते? हा खूप गंभीर प्रश्‍न आहे. पिस्तूल, मोबाईल या काही लपवून आत नेता येतील इतक्‍या छोट्या वस्तू नाहीत. मग या वस्तू आत गेल्याच कशा? हेच या प्रकरणात महत्वाचे आहे. आपल्याकडे पिस्तूल आहे याचा व्हिडीओ चक्क कैदीच कारागृहातून व्हायरल करतो, हे भयानक आहे. 

सेल्फी मोड ठेवून चित्रीकरण
व्हायरल झालेल्या क्‍लिपमध्ये कैद्याकडे पिस्तूल आहे. ते एका पार्सलमधून आले आहे. दुसऱ्या पार्सलमध्ये मोबाईल आहे आणि या साऱ्याचे चित्रीकरण आणखी एका मोबाईलमधून झाले आहे. कैद्यानेच सेल्फी मोडमध्ये मोबाईल ठेवून हे चित्रीकरण केल्याचे उघड आहे. 

यापूर्वी गांजा पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
कळंबा कारागृहात यापुर्वी गांजा पार्टी झाली होती. त्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. कारागृहात मोबाईल, गांजा नेत असताना कारवाईचा चार घटना उघडकीस आल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com