कलानंदीगडावर सापडल्या दोन तोफा; खलबत्ता

सुनील कोंडुसकर
मंगळवार, 21 मार्च 2017

चंदगड - ते मुंबईस्थित उच्चशिक्षित आहेत. चांगल्या कंपनीत, शासकीय नोकरीत स्थिरस्थावर आहेत. नोकरी, घर, बंगला, कुटुंब ही ध्येये तर आहेतच; परंतु त्या पलीकडे जाऊन त्यांना काही हटके करायचे आहे. सुटीचा दिवस ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या अभ्यासात घालवायचा आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते दर रविवारी महाराष्ट्रातल्या एखाद्या दुर्लक्षित किल्ल्याचा अभ्यास करतात. त्यांची भटकंती, कष्ट बघितले की या विषयातील तादात्म्य लक्षात येते. कलानंदीगड (ता. चंदगड) येथे गेले काही रविवार त्यांनी अभ्यासातून शोध लावले. दोन तोफा, औषधी कुटण्याचा खलबत्ता, बांधकामाचे अवशेष सापडले आहेत.

चंदगड - ते मुंबईस्थित उच्चशिक्षित आहेत. चांगल्या कंपनीत, शासकीय नोकरीत स्थिरस्थावर आहेत. नोकरी, घर, बंगला, कुटुंब ही ध्येये तर आहेतच; परंतु त्या पलीकडे जाऊन त्यांना काही हटके करायचे आहे. सुटीचा दिवस ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या अभ्यासात घालवायचा आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते दर रविवारी महाराष्ट्रातल्या एखाद्या दुर्लक्षित किल्ल्याचा अभ्यास करतात. त्यांची भटकंती, कष्ट बघितले की या विषयातील तादात्म्य लक्षात येते. कलानंदीगड (ता. चंदगड) येथे गेले काही रविवार त्यांनी अभ्यासातून शोध लावले. दोन तोफा, औषधी कुटण्याचा खलबत्ता, बांधकामाचे अवशेष सापडले आहेत. यापुढेही त्यांचा शोध सुरूच राहणार आहेत. पाचशे किलोमीटरवरून येऊन इथला इतिहास शोधणाऱ्या या तरुणांना स्थानिकांची मदत लाभली तर तो प्रकाशात येण्यास मदत होईल.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष असूरकर यांनी दोन महिन्यांपूर्वी या गडाला भेट दिली. स्थानिक लोकांना घेऊन त्यांनी गडाची पाहणी केली. त्यानंतर राजू रेडेकर यांच्या सहकार्याने मुंबईतील प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने गडाची स्वच्छता मोहीम हाती घेतली. परिसराची पाहणी करीत असताना गडाच्या खालच्या बाजूला तगात काही बांधकामाचे अवशेष आढळले. नीट पाहणी केली असता ती बाजारपेठ असल्याचे सकृतदर्शनी वाटते. मधोमध रस्ता आणि दोन्ही बाजूंनी बांधकाम केले असल्याचे दिसते.

अन्य गडांवर वरच्या बाजूला वस्ती होती तर या गडावर ती खालच्या बाजूला आणि गडावरून केवळ टेहळणी केली जात असावी, असे वाटते.

यासंदर्भात या परिसराची पाहणी आणि अभ्यास झाल्यास गडाचा इतिहास उजेडात येणार आहे. रविवारी (ता. १९) पुन्हा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच श्री. रेडेकर, ॲड. संतोष मळवीकर, रणजित भातकांडे, राजाराम वांद्रे, बाबू बिर्जे, संग्राम पोटजाळे आदींनी केलेल्या स्वच्छतेत दोन तोफा, औषधी कुटण्याचा खलबत्ता आदी साहित्य सापडले. पुरातत्त्व खात्याच्या सहकार्याने या तोफा गडावर पुनर्स्थापित करण्यात येणार आहेत. 

कलानंदीगडचा इतिहास... इतिहासप्रेमींना देणगी
महाराष्ट्रातील प्रत्येक गड-किल्ल्याचा इतिहास थोडा का असेना ज्ञात आहे; परंतु कलानंदीगडचा इतिहास मात्र अनभिज्ञ आहे. अत्यंत देखणा आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या किल्ल्याचा इतिहास उजेडात आला तर इतिहासप्रेमींसाठी ती एक देणगी ठरेल.

तरुणांना व्यसनापासून परावृत्त करून सामाजिक दिशा देण्याच्या दृष्टीने गड-किल्ल्यांना भेटी आणि त्यांचे संवर्धन हा उपक्रम हाती घेतला आहे. एकदा या विषयात गोडी वाढली तर अंगी सद्‌गुणांचा वास होऊन एक आत्मिक समाधानाची अनुभूती येते.
- संतोष असूरकर, अध्यक्ष, दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई

Web Title: kalanandigad found on the gun