कालकुपी ः सोलापुरातील मुळे पॅव्हेलियन 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

बदलत्या सोलापूरचा इतिहास - 04 
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु असलेल्या सोलापूर शहरातील गेल्या शंभर वर्षांतील वाटचालीचा आढावा या मालिकेतून घेतला जात आहे. आज (गुरुवारी) जाणून घेऊ या तत्कालीन नगरपालिकेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. रा. ब. मुळे यांनी उभारलेल्या पॅव्हेलियनची...

सोलापूर ः शहरातील ज्येष्ठ नागरिक व तत्कालीन नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांना थोडासा विरंगुळा मिळावा, या उद्देशाने लोकनियुक्त पहिले नगराध्यक्ष डॉ. व. वा. मुळे यांच्या पुढाकाराने पार्क मैदानावर (पूर्वीचे नाव कामगार मैदान, सध्या इंदरा गांधी स्टेडयम) या पॅव्हेलियनची उभारणी करण्यात आली आहे. 

हेही वाचा.... कालकुपी-01 ः सोलापुरातील हुतात्मा बाग 

म्हणून दिले डॉ. मुळे यांचे नाव 
हे पॅव्हेलियन उभारण्यासाठी डॉ. मुळे यांनी घेतलेला पुढाकार व त्यांचा उद्देश पाहून, या पॅव्हेलियनला रा. ब. डॉ. मुळे पॅव्हलिलयन असेच नाव देण्यात आले. सध्याच्या पार्क मैदानाची जागा 12 जुलै 1904 रोजी सरकारकडून नगरपालिकेस मिळाली. या ठिकाणी खड्डे व उंचवटे होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणही होती. जागा स्वच्छ करण्यासाठी 1913-14 पर्यंत नगरपालिकेने नऊ हजार रुपये खर्च केले. 1919 मध्ये ही जागा रेवणी स्कीममध्ये आली. दरम्यान, मैदानातील जागेची विविध संस्थांकडून मागणी होऊ लागल्याने, संपूर्ण जागा नगरपालिकेच्या हातून जाते की काय, अशी स्थिती झाली. त्यामुळे डॉ. मुळे यांनी क्रीडांगणाची गरज असल्याचे शासनास कळवले. त्यामुळे पार्कची जागा ताब्यात आली. 

हेही वाचा.... कालकुपी-02 ः सोलापुरातील कस्तुरबा (धाकटी) मंडई 

1943 मध्ये झाले उद्‌घाटन 
रेवणी स्कीममधील अटीनुसार 1925 मध्ये पार्कवर बगीचा, खेळाचे मैदान व पॅव्हेलियन बांधण्याचे ठरले. त्यानुसार 23 मार्च 1942 रोजी डी. बी. देवधर यांच्या हस्ते भूमिपूजन, तर तत्कालीन मुंबई राज्याचे गव्हर्नर सर रॉजर लिमे यांच्या हस्ते 23 जानेवारी 1943 रोजी या पॅव्हेलियनचे उद्‌घाटन झाले. सन 1969 पर्यंत हे पॅव्हेलियन आणि मैदान जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत होते. महापालिकेने 1970-71 मध्ये महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून मैदानासह पॅव्हेलियन ताब्यात घेतले. सध्या या पॅव्हेलियनच्या सभागृहात विविध कार्यक्रम आयोजले जातात. शिवाय, टेबल टेनिस स्पर्धांचे आयोजन केले जाते, तर पॅव्हेलियनमधील इमारतीत महापालिकेचे क्रीडा कार्यालय आहे.  

हेही वाचा.... कालकुपी-03 ः सोलापुरातील रेल्वे स्टेशन (गांधी) चौक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalkupi - 04 : solapur mule pavilion