कालकुपी ः सोलापुरातील पहिले सार्वजनिक वाचनालय - 1853

विजयकुमार सोनवणे
Friday, 29 November 2019

बदलत्या सोलापूरचा इतिहास - 05 
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु असलेल्या सोलापूर शहरातील गेल्या शंभर वर्षांतील वाटचालीचा आढावा या मालिकेतून घेतला जात आहे. आज (शुक्रवारी) जाणून घेऊ या 1853 मध्ये स्थापन झालेल्या पहिल्या जिल्हा वाचन मंदीराची. 

सोलापूर ः येथील पहिल्या सार्वजनिक वाचनालयाची स्थापना 1853 मध्ये झाली, ती नेटिव्ह जनरल लायब्ररी, सोलापूर (जिल्हा वाचन मंदिर, सोलापूर) या नावाने. सध्या देशातील एक अग्रगण्य वाचनालय म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, तेच हे वाचनालय सध्या श्री हिराचंद नेमचंद वाचनालय या नावाने सुपरिचित आहे. 

हेही वाचा... कालकुपी -1 ः सोलापुरातील हुतात्मा बाग 

नगर वाचनालयाचे नामकरण 
सध्या महापालिकेची शाळा क्रमांक एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळेत या वाचनालयाची सुरवात झाली. त्यावेळी 1450 इतकी ग्रंथसंपदा होती. 1922 मध्ये हे वाचनालय दाणीभुवन येथे हलवण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी हे वाचनालय, शेठ हिराचंद नेमचंद दोशी यांनी दिलेल्या 14 हजार 500 रुपयांच्या देणगीतून हुतात्मा चौक परिसरातील जागेत उभारण्यात आले आहे. वाचन मंदिर उभारण्यास शेठ हिराचंद दोशी यांनी दिलेल्या सहकार्याची कृतज्ञता म्हणून शेठजींच्या जन्मशताब्दी वर्षी या नगर वाचनालयाचे "हिराचंद नेमचंद वाचन मंदिर' असे नामकरण करण्यात आले. सुरवातीच्या काळात बुद्धिवंतांसह शासन व नगरपालिकेकडून वाचनालयास मदत मिळत होती. मात्र, 1912 च्या सुमारास वाचनालयाच्या ग्रंथसंग्रहालयात शासकीयदृष्ट्या काही आक्षेपार्ह ग्रंथ सापडले. पोलिसांनी ते सर्व जप्त केले. पण शहरातील काही प्रमुख मंडळींनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना भेटून जप्त केलेला ग्रंथसंग्रह सोडवून आणला. 

हेही वाचा... कालकुपी- 2 ः सोलापुरातील कस्तुरबा (धाकटी) मंडई 

नूतन वास्तूचे उद्‌घाटन पु.ल. देशपांडे व पंडीत भीमसेन जोशी यांच्या हस्ते 
1940 मध्ये कॅंप व मोदीखाना लायब्ररी या दोन ग्रंथालयांचे नगर वाचन मंदिरात विलीनीकरण झाले. ग्रंथालय चळवळींना उत्तेजन देण्याच्या मुंबई सरकारच्या योजनेतून 1947 मध्ये या वाचन मंदिरास जिल्हा ग्रंथालयाचा दर्जा मिळाला. तत्कालीन नगरपालिकेकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून 1950 मध्ये मोफत वृत्तपत्र वाचन विभाग सुरू करण्यात आला. ग्रंथालयाच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन पद्मभूषण पंडित भीमसेन जोशी आणि वाचनालयाचे तत्कालीन अध्यक्ष श्रीराम पुजारी यांच्या हस्ते 19 जुलै 1992 रोजी झाले; तर उद्‌घाटन महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पद्मभूषण पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली 25 जुलै 1994 रोजी झाले. 

हेही वाचा... कालकुपी- 3 ः सोलापुरातील रेल्वे स्थानक (गांधी) चौक 

सध्या कार्यरत आहेत विविध विभाग 
सध्या वाचनालयाच्या परिसरात (कै.) रंगनाथ लळीत सभागृह, कवी कुंजविहारी सभागृह, रामकृष्ण रापेल्ली बालविभाग, महाकवी द. रा. बेंद्रे संदर्भ विभाग, टिळक स्मारक मंदिर मोफत वृत्तपत्र विभाग, श्रीराम पुजारी कला संकुलांतर्गत ऍम्फी थिएटर, संगीत थिएटर आणि डॉ. वा. का. किर्लोस्कर सभागृह आहे. वाचनालय आणि इंडियन रेकॉर्डस्‌ कलेक्‍टर्स संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संगीत संग्रहालय सुरू करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले डॉ. यू. एम. पठाण, डॉ. य. दी. फडके आणि मारुती चितमपल्ली, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले हे या वाचनालयाचे सदस्य आहेत. 

हेही वाचा... कालकुपी- 4 ः इंदिरा गांधी (पार्क) स्टेडियमवरील मुळे पॅव्हेलियन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalkupi - 05 : first general laibrary in solapur 1853