कालकुपी : सोलापूर नगरपालिकेची पहिली शाळा ः 1854

विजयकुमार सोनवणे
Sunday, 1 December 2019

बदलत्या सोलापूरचा इतिहास - 06
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु असलेल्या सोलापूर शहरातील गेल्या शंभर-दीडशे वर्षांतील वाटचालीचा आढावा या मालिकेतून आपण घेत आहोत. आज (शनिवारी) जाणून घेऊ या 1854 मध्ये स्थापन झालेल्या तत्कालीन नगरपालिकेच्या पहिल्या शाळेची. 

सोलापूर  : 1853 च्या सुमारास मुलांची एक मराठी व एक इंग्रजी शाळा होती. इंग्रजी शाळेत मॅट्रिकपर्यंतचे वर्गही नव्हते. मुलींच्या शाळेचा पत्ता नव्हता. मुलींना घरी शिक्षण दिले जाई. तेवढेच स्त्री- शिक्षण अशी स्थिती होती. खास मुलींसाठी अशी कोणतीच व्यवस्था या सुमारास नव्हती. अशा स्थितीत सध्याच्या दत्त चौकात असलेल्या मराठी शाळा क्रमांक एक ही 1853 मध्ये बांधण्यास सुरवात केली. 1854 पासून या शाळेतील वर्ग सुरू झाले. 

हेही वाचा.... कालकुपी  :  बदलते सोलापूर  : भाग 1 ते 5 

सुधारणा समितीने दिले पाचशे रुपये 
तत्कालीन सुधारणा समितीने 3 ऑगस्ट 1854 रोजी ठराव करून सरकारला पाचशे रुपये उपलब्ध करून दिले. त्या पैशातून या शाळेचे बांधकाम करण्यात आले, तसेच ग्रंथालय सुरू झाले. 1875-76 मध्ये शहरात मुलांच्या तीन मराठी शाळा, एक मुलींची व एक हिंदुस्थानी आणि एक इंग्रजी अशा एकंदर सहा शाळा होत्या. या शाळांवर दरमहा 149 रुपये, तर इंग्रजी शाळेवर 82 रुपये खर्च होता. एक एप्रिल 1885 पासून शिक्षण विभाग नगरपालिकेच्या नियंत्रणाखाली आले. नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यावर शहरातील सर्व शाळांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले. 

हेही वाचा... जळगाव शहरात आता महिलांसाठी विशेष रिक्षा

शाळेच्या ठिकाणी उभारले व्यापारी संकुल 
दत्त चौक परिसराचे व्यापारी महत्त्व वाढल्यामुळे तसेच महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली. त्यामुळे या शाळेच्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारणे आणि शेजारीच शाळा बांधण्याचा ठराव झाला. त्यानुसार कार्यवाही होऊन, 1989-90 मध्ये व्यापारी संकुल उभारण्यात आले. सध्या या ठिकाणी अंत्रोळीकर व्यापारी संकुल आहे. त्याच्या शेजारीच नवीन इमारत बांधून त्या ठिकाणी शाळा क्रमांक एक सुरू करण्यात आली. तीही कालांतराने बंद पडल्याने, सध्या या शाळेत महापालिकेचे विभागीय कार्यालय आहे. 

हे ही वाचा.. लई भारी, सोलापूर महापालिकेत झाला विक्रम

सोलापुरात उर्दू माध्यमातील पहिले "टॅब स्कूल' 
स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी अत्यावश्‍यक बनलेला "टॅब' हाताळण्याचे सुवर्णक्षण भांडी घासणाऱ्या चिमुकल्या हातांना अनुभवता येणार आहेत. हा दुग्धशर्करा योग जुळवून आणला महापालिका उर्दू शाळेतील शिक्षकांनी आणि तोही लोकवर्गणीच्या माध्यमातून. उर्दू माध्यमाच्या महापालिका शाळेत राज्यातील पहिले "टॅब स्कूल' सुरू करण्याचा मान या शाळेस मिळाला आहे. सरकारी शाळांमध्ये गरिबांची मुले-मुली शिक्षण घेतात. मजुरीसाठी आई-वडील सकाळीच घराबाहेर पडल्यामुळे घरातील कामे करण्याची जबाबदारी या मुलांवर येते. त्यांच्या शिक्षणाकडेही कोणी गांभीर्याने पाहात नाही. वेळेवर शाळा नाही, पुस्तके नाहीत. अशा स्थितीत शिकण्याची इच्छा असली तरी शाळेत जायची संधी नाही. शिक्षणासाठी लागणारे साहित्य कोण देणार, हा यक्षप्रश्‍न असतो. आता या सुविधेमुळे गरीब आणि शैक्षणिक सुविधांपासून वंचित मुलेही आता खासगी शाळांतील विद्यार्थ्यांप्रमाणे "डिजिटल' शिक्षण घेतील. भांडी घासणारे चिमुकले हात आता सफाईदारपणे संगणक हाताळणार आहेत. संगणकावर चित्रे काढणे, पुस्तकातल्या गोष्टी दृश्‍य स्वरूपात पाहणे, कोडी सोडविणे, गणिताचा अभ्यास करण्याचे शिक्षण दिले जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalkupi - 06 : first school of solapur muncipalty 1854