सोलापुरातले पहिले जलशुद्धीकरण केंद्र ः 1946 

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 2 डिसेंबर 2019

बदलत्या सोलापूरचा इतिहास - 07 
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु असलेल्या सोलापूर शहरातील गेल्या शंभर-दीडशे वर्षांतील वाटचालीचा आढावा या मालिकेतून आपण घेत आहोत. आज (सोमवारी) जाणून घेऊ या 1946 मध्ये सुरु झालेल्या सोलापुरातील पहिल्या जलशुद्धीकरण केंद्राची. 

सोलापूर  :  शहराला सध्या तीन ठिकाणाहून पाणी शुद्ध करून पुरवठा केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्र सुरु करण्यात आले. त्याचे उदघाटन 1946 मध्ये तत्कालीन स्थानिक स्वराज्य संस्था मंत्री गोविंदराव वर्तक यांच्या झाले. तत्पूर्वी उभारण्यात आलेल्या पाणी खेचण्याच्या यंत्रणेचे उद्‌घाटन 11 फेब्रुवारी 1932 रोजी मंत्री सरदार रुस्तूम वकील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. व्ही. व्ही. मुळे होते. कोणत्याही शासकीय अनुदानाची वाट न पाहता नगरपालिकेने स्वखर्चाने ही यंत्रणा बसवली होती. त्याचे श्री. वकील यांनी कौतुकही केले होते. 

हेही वाचा.... कालकुपी ः बदलते सोलापूर भाग 1 ते 6

शहराचा पाणीपुरवठा सिद्धेश्‍वर तलावातून 
अठराव्या शतकामध्ये सोलापूर शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा सिद्धेश्‍वर तलावावर अवलंबून होता. तलाव पूर्ण भरल्यानंतरचे या तलावाचे संपूर्ण क्षेत्रफळ साडेअडतीस एकर होते. तलावात जास्तीत जास्त 13 फूट खोल पाणी राहू शकत होते. मात्र शहर वाढत गेले तसे तलावातील पाणी कमी पडू लागले. तलावाची खोली वाढविण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी दोन हजार रुपयांची तरतूदही करण्यात आली. तलावातील पाण्यात आंघोळ करणे, जनावरे धुणे हे प्रकार होत असत. पिण्यासाठी वापरताना त्यावर प्रक्रिया करावी लागे. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्र सुरु करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला. पहिल्या टप्प्यात इंजिनासाठी संपकिट, एक दिडशे अश्‍वशक्तीचे नवे इंजिन बसविण्याचे काम 1930 मध्ये सुरु होऊन ते 1932 मध्ये पूर्ण केले. सरकारने पब्लिक हेल्थ खात्याचे येथील कार्यालय बंद केले. त्यानंतर नगरपालिकेने तेच कर्मचारी आपल्याकडे वर्ग करून घेतले व काम सुरु ठेवले. 

हेही वाचा... भ्रष्टाचारी व दुराचाऱ्यांना पाठीशी घालणारी महापालिका 

पाणी साठविण्यासाठी पाच गॅलनचा हौद 
फिल्टरचे काम करण्यासाठी सव्वादोन लाख रुपयांचा प्रस्ताव 1935-16 मध्ये शासनाकडे गेला. पण प्रत्यक्षात कर्ज मंजूर होऊन काम सुरु होण्यास पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागला. 25 एप्रिल 1942 च्या ठरावाने हे काम पब्लिक हेल्थ इंजिनिअरकडे सोपविण्यात आले. या कामासाठी 4.20 लाख रुपये खर्च अपेक्षित होता. त्यामध्ये एरिगेशन, फौंटन, विजेवर चालणारे फ्लाक्‍टुलेटर यंत्र, सहा फिल्टर, त्यासाठी इमारत, वॉश वॉटर टॅंक आदीचा समावेश होता. पाच लाख गॅलन फिल्टर केलेले पाणी राहू शकेल असा एक हौदही बांधण्यात आला. 

हेही आवर्जून वाचा... बापरे... उजनी जलाशयात मगर 

पाणी शुद्धीकरण केंद्राचे उद्‌घाटन 
सुरवातीच्या काळात दगडी कोळशाच्या मदतीने फिल्टर यंत्रे चालविली जात होती. त्यानंतर डिझेलच्या साह्याने हे काम सुरु झाले. त्यासाठी केंद्राशेजारीच टाकी उभारण्यात आली. पुढे पुढे हे काम विजेवर सुरु झाले. जलदगतीने पाणी शुद्धीकरणाचे काम होणाऱ्या या केंद्राचे उद्‌घाटन 19 ऑक्‍टोबर 1946 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेचे मंत्री गोविंदराव वर्तक यांच्या हस्ते झाले. सध्या एकरूख, उजनी योजनेतून पाणी येथे येते. त्यावर रासायनिक प्रक्रिया झाल्यावर हे पाणी शहराच्या विविध भागात पुरविले जाते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalkupi - 07 : First water treatment plant of solapur - 1946