कालकुपी ः सोलापुरातील रेल्वे स्टेशन (गांधी) चौक 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

बदलत्या सोलापूरचा इतिहास ः 03 
सोलापुरातील शंभर ते सव्वाशे वर्षांपासून अस्तित्वात असलेले घटक आणि सध्या त्यांच्या खुणा पाहताना नक्कीच स्मरणरंजन होईल. या वास्तू घडताना, त्यांची जुनी रुपे पाहताना इतिहासाचे भाव जागवल जाईल. सोलापूरचा इतिहास सांगणारी ही कालकुपीच्या मालिकेच्या तिसऱ्या भागात आज माहिती घेऊ या रेल्वे स्टेशन चौकाच्या विकासाची.... 

सोलापूर ः सध्या वाहनांचे, रिक्षांचे अतिक्रमणामुळे सतत वेढला जाणाऱ्या रेल्वे स्टेशनच्या चौकाचे 1952-53 मधील छायाचित्र पाहिले की किती प्रसन्न वाटते. मात्र आजच्या घडीला या चौकात थांबले की श्‍वास गुदमरायला होते. जुन्या काळातील छायाचित्र पाहिले की त्यावेळच्या रस्त्याची भव्यता दिसून येते. 

67 वर्षांपूर्वीचा भव्य चौक 
भव्य रिंगण आणि त्या ठिकाणी असलेल्या दिव्यांचा स्तंभ पाहिल्यावरच रस्त्याच्या विस्तारीकरणाची माहिती होते. 1913 पर्यंत रेल्वे स्टेशन तत्कालीन नगरपालिकेच्या हद्दीबाहेर होते. त्यामुळे नगर पालिकेस कर मिळत नव्हता. म्हणून रेल्वे स्टेशन व परिसराचा समावेश नगर पालिकेच्या हद्दीत करण्याचे पत्र नगरपालिकेने शासनाकडे पाठवले. त्यानुसार 15 डिसेंबर 1913 रोजी विशेष हुकुम काढून रेल्वे स्टेशनचा समावेश नगरपालिका हद्दीत झाला आणि 24 ऑगस्ट 1911 च्या तरतुदीनुसार रेल्वेकडून कर वसुलीचा अधिकार दिला. स्टेशन हद्दीत आल्याने या चौकाचे महत्त्व वाढले. त्या अनुषंगांने नगरपालिकेने स्टेशन चौकाचे विस्तारीकरण केले. चौकात गोलाकार आयलॅंड उभारून स्तंभ उभारला. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी बसगाड्यांची सोय केली. काही कालावधीनंतर या चौकात महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्यात आला. तत्कालीन पतंप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 12 एप्रिल 1960 रोजी या पुतळ्याचे अनावरण झाले. 

हेही वाचा.... कालकुपी 01 ः सोलापुरातील हुतात्मा बाग 

पुतळ्यांबाबत महापालिकेस अनास्था 
आदर्श घेण्यासाठी उभारण्यात आलेल्या अनेक राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा असलेला परिसराचे वर्णन न केलेलेच बरे. विशेष म्हणजे पालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी लाखो रुपयांची तरतूद पुतळा उभारणे किंवा सुशोभीकरणासाठी ठेवली जाते. मात्र त्यापैकी किती रक्कम प्रत्यक्षात खर्ची पडते, हा संशोधनाचा विषय आहे. जयंती किंवा पुण्यतिथी आली, की संबंधित पुतळा व परिसराची स्वच्छता केली जाते. त्यानंतर वर्षभरात त्या पुतळ्यांकडे कोणीही पाहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

गांधी पुतळ्याच्या सुशोभिकरणाची मागणी 
दोन ऑक्‍टोबर रोजी गांधी जयंती आणि 30 जानेवारी पुण्यतिथी आली की या पुतळ्याच्या परिसराची स्वच्छता केली जाते. जगाला शांती, सहिष्णू आणि सत्याग्रहाचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची सोलापुरात उपेक्षा होत आहे, अशी सातत्याने ओरड होते. रेल्वे स्थानकासमोरच पुतळा आहे. देश व परदेशातील प्रवासी येथे उतरत असतात. भारताला गांधींचा देश म्हटले जाते. त्याच्या देशातील सोलापुरातील हे चित्र बदलणे आवश्‍यक असून, त्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशीही मागणी होते, मात्र त्याबाबत कुणीच गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आले आहे. 

हेही वाचा... कालकुपी 02 ः सोलापुरातील कस्तुरबा (धाकटी) मंडई 

पुतळ्यांची देखभाल करण्याचे काम पालिका प्रशासनाचे

परंतु या पुतळ्यांच्या देखभालीकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना समाजकंटकांकडून होण्याऐवजी पालिकेकडूनच होत असल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळत आहे. याविषयी पालिका अधिकाऱ्यांना ना खंत आहे ना खेद, असे चित्र निर्माण झाले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार जे कोणी पुतळे उभारतात, त्यांनीच त्यांची काळजी घेऊन देखभाल करणे आवश्‍यक आहे. असे असताना पुतळे उभारण्याचे काम पालिकेने केले असले तरी त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी आपली नसल्याचा समज करून त्यांच्या देखभालीकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. काही लोक तर पुतळ्यांच्या संरक्षक कठड्यांवर कपडे वाळत घालतात, अनेक पुतळ्यावर धूळ जमा झालेली असते. त्याबाबत पालिकेला काहीच गांभीर्य नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalkupi.. old solapur... railway station chowk