
बदलत्या सोलापूरचा इतिहास ः 08
स्मार्ट सिटीकडे झपाट्याने वाटचाल सुरु असलेल्या सोलापूरचा गेल्या शंभर - दीडशे वर्षांच्या इतिहासामध्ये आज (मंगळवार) माहिती घेऊ या ब्रिटीश कालावधीतील अनेक महत्वपूर्ण घटनांचा साक्षीदार असलेल्या मेकाॅनिकी चौकाची...
सोलापूर : स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांच्या विरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याचे ठिकाण म्हणजे मेकॉनिकी चौक. स्वातंत्र्य मिळून आज 72 वर्षे उलटली. मात्र आंदोलनाची सुरवात या चौकातून सुरु करण्याची परंपरा आजही कायम आहे. पक्ष कोणताही असो, महागाईच्या विरोधात असो, राजकीय पक्षाचा निषेध करायचा असो किंवा इतर कोणत्याही विषयावर आंदोलने करायची झाल्यास त्याची सुरवात येथून होते.
हेही वाचा... नगरपालिकेची पहिली शाळा आणि कालकुपी भाग 1 ते 5
शहराचा राजमार्ग
मेकॉनिकी चौक म्हणजे 1952 च्या सुमारास सोलापूर शहरातील तत्कालीन राजमार्ग. शहरातून रेल्वे स्थानकाकडे जाण्याचा हा एकमेव मार्ग. त्याचबरोबर करमणुकीचे केंद्र असलेली चित्रपटगृहेही याच परिसरात. त्यामुळे या चौकाला शहराच्या तत्कालीन आराखड्यात पहिले स्थान. सोलापूर शहर हे जेंव्हा रेल्वेच्या नकाशावर आले तेंव्हा सोलापूर रेल्वे स्थानकाला शहरातून जाण्यासाठी श्री सिद्धेश्वर देवालयासमोरील रस्त्याने व पार्क समोरून जावे लागत होते. हा मार्ग फारच गैरसोईचा होता म्हणून सध्या नवीन वेस पोलिस चौकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणची शहर तटबंदी तोडून रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता तत्कालीन जिल्हाधिकारी ए. एफ. इस्कॉयल मेकॉनिकी यांनी तयार केला. शिवाय हा परिसर सुधारण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतले. त्याचा आदर म्हणून या चौकाला मेकॉनिकी चौक असे नाव देण्यात आले.
हेही वाचा... मगरीपासून संरक्षणासाठी यंत्रणा उभी करा
रॉकेलचे दिवे, आकर्षक कंदील
विजेची सोय नसल्यामुळे पूर्वी मुख्य रस्त्यांवर रॉकेलचे दिवे लावण्यात येत असत. त्यासाठी ठिकठिकाणी आकर्षक पद्धतीचे कंदील लावण्यात आले. त्यामुळे सुरवातीला हा परिसर पाच कंदील या नावानेच प्रसिद्ध होता. शहरातील तेरा ठिकाणी अशा पद्धतीचे कंदील कमी-अधिक संख्येने लावण्यात आले आहेत. जे आजही अस्तित्वात आहेत. सोलापूर नगरपालिकेच्या इतिहासात डांबरी रस्ता करण्याचा मान मेकॉनिकी चौक ते फौजदार चावडी या मार्गाला मिळाला. मेकॉनिकी चौकातील कंदीलाच्या चोहाबाजूंनी दिशादर्शक चौकटी बसवण्यात आल्या. याच ठिकाणी स्वातंत्र्यलढ्याबाबत विविध घटना झाल्या. त्यामुळे 1914 ते 1919 या कालावधीत महायुद्धात वीर मरण आलेल्या आणि 1939 ते 1945 या कालावधीत स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतलेल्या सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांची स्मारके उभारण्यात आली.
महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार
ब्रिटीश राजवटीत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे ब्रिटिश सरकारने सोलापुरात "मार्शल लॉ' लागू केला. 9 ते 11 मे व 12 मे 1930 च्या दुपारपर्यंत सोलापूर शहर ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाले होते. याचा परिणाम म्हणून 12 मे ला सोलापुरात लष्करी कायदा जारी करण्यात आला. या कायद्यातील अकराव्या नियमानुसार तिरंगा झेंडा व अन्य अशी प्रतीके यांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली होती. यातील "अन्य अशी प्रतीके' या शब्दांचा आधार घेऊन ब्रिटिश सैनिकांनी गांधी टोपीवर बंदी आणली होती. सैनिकांनी काठीच्या टोकाला हूक लावून गांधी टोपी काढून घेतल्याची नोंद इतिहासात सापडते. या घटनेची चर्चा थेट ब्रिटिश संसदेत झाली होती. या सर्व घटनांना मेकॉनिकी चौक साक्षीदार आहे.