दुधासारखी घरपोच मिळताहेत विषारी "कल्लू'ची पाकिटे! 

solapur
solapur

सोलापूर : ताडीमध्ये क्‍लोरेल हायड्रेट नावाचे विषसदृश घटक आढळून आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताडी विक्रीची दुकाने बंद केली असली तरी सोलापूरच्या अनेक भागात आजही ताडीसारख्या रंगाचे रसायन मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. पूर्वभागात कल्लू नावाने प्रसिद्ध असलेले हे रसायन अगदी दहा ते वीस रुपयांना उपलब्ध आहे. आता तर कल्लूची दुधासारखी पाकिटे आणि पावडरच्या पुड्या दहा ते वीस रुपयांत घरपोच मिळत असल्याने व्यसनाधीनता अधिकच वाढत आहे. 

कामगार वस्ती असल्याने पूर्वभागात काही ठिकाणी विषारी ताडीचे गुत्ते आजही जोरात चालू आहेत. पूर्वी ताडी विक्री दुकानांना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी दिली जात होती. ताडीमध्ये क्‍लोरेल हायड्रेट नावाचे विष आढळून आल्याने ताडी विक्री दुकानांना परवानगी देणे बंद करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नोंदीनुसार पूर्वी सोलापूर शहरात 27 दुकाने होती, आता ही दुकाने पूर्णपणे बंद असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पूर्वी सोलापुरात ताडीची झाडे भरपूर होती, आता मात्र शहरात एकही झाड नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

थोडीशी पावडर घातली की 20 ते 25 लिटर ताडीसदृश पेय बनवले जाते. 15 ते 20 रुपयांना बाटली किंवा पाकीट गल्लोगल्ली उपलब्ध होते. हे थांबवण्यासाठी अपेक्षित प्रयत्न होताना दिसत नाहीत. ताडीसदृश विष विकणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईची भीती राहिली नसल्याचे चित्र आहे. पोलिसांची कारवाई आणि हप्त्याचे टेन्शन नको म्हणून आता काही ठिकाणी दुधाप्रमाणे ताडीसदृश रसायनाची पाकिटे आणि पावडरच्या पुड्या घरपोच दिल्या जात असल्याचे समोर आले आहे. 

वीस रुपयांत होते दिवसभराची नशा 
शासनाच्या नोंदीनुसार ताडी दुकाने बंद 
गल्लोगल्ली मिळतेय ताडीसदृश रसायन 
झोपडपट्टी परिसर, विडी घरकुल वसाहतींमध्ये अनेक गुत्ते 
ताडीच्या नावाने मिळणाऱ्या रसायनात क्‍लोरेल हायड्रेट 

 

दहा वर्षे कारावासाची तरतूद -
ताडीमध्ये क्‍लोरेल हायड्रेट आढळून आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने पत्राद्वारे पोलिस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाला कळविले आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्याने तत्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे. या प्रकरणात कलम 328 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याबाबत कळविण्यात आले आहे. दुखापत होण्याची शक्‍यता असल्याचे माहिती असूनही एखाद्याला विष किंवा नशाकारक, अपथ्यकारक पदार्थ सेवन करण्यास देणाऱ्याला दहा वर्षे कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. 

ताडीसदृश रसायन, ताडी कल्लू हे विष आहे याची माहिती असूनही अनेक ठिकाणी बिनधास्तपणे त्याची विक्री होत आहे. कामगार वस्तीमध्ये कल्लू पिल्यानंतरच दिवसाची सुरवात होते. पूर्व भागातील कामगार वर्गात हे प्रमाण अधिक आहे. अनेक विडी कामगार महिलांनाही कल्लूचे व्यसन असल्याचे दिसून आले आहे. व्यसनाधीनेतून वेगवेगळे आजार आणि अकाली मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. समाजासाठी घातक असणाऱ्या ताडीसदृश विषारी पेयाची विक्री पूर्णपणे बंद व्हायला हवी. 
- सत्यनारायण गुर्रम, सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com