महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवर कमलेश पिसाळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

दक्षिण विभाग (सातारा) येथून ऍड. पिसाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सातारा ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) कार्यकारिणीवर दक्षिण विभागातील सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी म्हणून येथील ऍड. कमलेश पिसाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुढील तीन वर्ष ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्वोच्च समितीवर कार्यरत राहणार आहेत. ही निवडणूक नुकतीच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे (पुणे) मैदानावर झाली. त्यामध्ये दक्षिण विभाग (सातारा) येथून ऍड. पिसाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे.
 
ऍड. पिसाळ हे जिल्ह्यातील विविध क्रीडा संस्थांवर कार्यरत आहेत, तसेच सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या संयोजनात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या क्रिकेट विश्‍वात साताऱ्याचे मोठे योगदान असून, एमसीएमध्ये जिल्ह्यातील प्रतिनिधी असावेत म्हणून सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशने 15 वर्ष न्यायालयीन लढाई लढवली होती. त्यामुळेच राज्य समितीवर जिल्हा प्रतिनिधींना स्थान मिळविण्यास प्रारंभ झाला आहे. ज्येष्ठ क्रीडा संघटक सुधाकर शानभाग हे आजपर्यंत जिल्ह्याचे प्रतिनिधी या नात्याने एमसीएवर कार्यरत होते. 

साताऱ्यात गुणी क्रिकेटपटू आहेत. मात्र, स्पर्धात्मक गुणवत्ता सुधारण्यासाठी होणारे सामने क्रीडांगणाच्या अभावी मोठ्या प्रमाणात घेता येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. या परिस्थितीत साताऱ्याचे खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. सदरची अडचण दूर करण्याकरिता ऍड. पिसाळ यांचे मोलाचे योगदान ठरेल, असे मत क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kamlesh Pisal elected on executive committee of Maharashtra Cricket Association