कणेरी तलाठ्यासह दोघे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

कणेरी तलाठ्यासह दोघे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

आपटी - कणेरी (ता. पन्हाळा) सज्जातील तलाठी शिवाजी चंदर कोळी (वय ५३, रा. बोरपाडळे, ता. पन्हाळा) व त्याचा खासगी उमेदवार सुशांत बाजीराव लव्हटे (२३, रा. कोतोली, ता. पन्हाळा) पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. 

कणेरीपैकी धनगरवाडा येथील गट ५३३ मधील ३२ गुंठे व गट ५३४ मधील चार गुंठे इतकी जमीन तक्रारदारांनी खरेदी केली होती. या जमिनीसह शिंदेवाडी येथील गट ५८९ मधील ७० गुंठे जमिनीच्या सातबारा पत्रकी वारसांची नावे नोंद करण्यासाठी तलाठी कोळीशी तक्रारदार अभिमन्यू पाटील यांनी संपर्क केला. त्यावेळी कोळीने त्यांच्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीत पाच हजार रुपये निश्‍चित झाले.

पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ११ फेब्रुवारीला तक्रार केली. विभागाने त्याची शहानिशा करून आज कणेरी तलाठी कार्यालयात सापळा लावला. पाटील यांना पंचासोबत कोळीकडे पाठवले. कोळीने पंचासमोरच पाटील यांच्याकडून लाच घेतली व खासगी उमेदवार सुशांत लव्हटेकडे ठेवण्यासाठी दिली. या वेळी पोलिस उपाधीक्षक गिरीश गोडे, निरीक्षक मारुती पाटील, सहायक फौजदार शामसुंदर बुचडे, पोलिस नाईक शरद पोरे, कॉन्स्टेकल कृष्णात पाटील, रुपेश माने यांनी कोळी व लव्हटेला पकडले. झडतीत लव्हटेकडे लाचेची रक्कम मिळाली तर कोळीच्या दोन्ही हाताला पावडर लागल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, तलाठी कोळीच्या घरी लग्न कार्य असून बोरपाडळे गावाचीही यात्रा आहे.

पन्हाळा आघाडीवर
शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढूनही टेबला खालून पैसे घेण्याची वृत्ती जोपासण्यात महसूल खाते आघाडीवर आहे. वर्षभरात पन्हाळा तालुक्‍यात आजच्या कणेरी येथील तलाठ्यासह दुययम निबंधक कार्यालयातील सहाजण तर शाहूवाडी तालुक्‍यात दोन तलाठी आणि गटशिक्षणाधिकारी यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत अधिकाऱ्यांनी पकडले आहे. बहुतेक कर्मचाऱ्यांनी लाच घेण्यासाठी पंटर ठेवले आहेत. कारवाई झाली की आठवडाभर जपून कामे होतात आणि मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू होते.

‘अब तक नौ’
तक्रारदार अभिमन्यू पाटील यांनी आजपर्यंत तीन कार्यालयातील लाचखोर अधिकाऱ्यांबाबत तक्रार केली व नऊ जणांना अटक करून दिली आहे. यामध्ये डॉक्‍टर, पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयातील सहा कर्मचारी व आजच्या कारवाईतील दोघांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com