म्हणे पुरामुळे कर्नाटकात हानी झाल्यास "महाराष्ट्र' जबाबदार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

बेळगाव - तहान लागल्यानंतर महाराष्ट्राची आठवण काढणाऱ्या कर्नाटकला आता कृष्णा नदीतील पाण्याच्या विसर्गाचे वावडे वाटू लागले आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून अतिरिक्त पाण्याच्या विसर्गाने जीवितहानी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास महाराष्ट्राला जबाबदार धरावे, अशी अजब मागणी कन्नड संघटनांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना निवेदनही पाठविले आहे. 

कन्नड संघटनांनी आज (ता. 2) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील विविध जलाशयांनी धोक्‍याची पातळी गाठली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाण्याचा विसर्ग वाढून कृष्णा काठावर धोका निर्माण होत आहे. भविष्यात अशी स्थिती कायम राहिल्यास 2005-06 वर्षी झाला तसा धोका निर्माण होऊ शकतो, असे कन्नड संघटनेने निवेदनामध्ये म्हटले आहे.

यासाठी यासंदर्भात महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून कृष्णा काठावर धोका किंवा हानी झाल्यास त्याला महाराष्ट्र जबाबदार राहील, या आशयाचे पत्र महाराष्ट्राला पाठविण्याची मागणी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याकडे केली आहे. 

उन्हाळ्यात तहान लागल्यानंतर महाराष्ट्राची कर्नाटकाला आठवण येते. आता महाराष्ट्र पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढून जलाशयांची पातळी वाढली आहे. महाराष्ट्रातील कोयना, राजापूर, वारणा आणि दूधगंगा जलाशयांचे पाणी कर्नाटकाला सोडले जात आहे. या पाण्याच्या विसर्गावरूनच कन्नड संघटनांकडून खडे फोडण्यास सुरुवात झाली आहे. 

अतिरिक्त पाण्यामुळे 2005-06 मध्ये मोठी हानी होऊन कृष्णा काठावरील जनतेने स्थलांतर केले होते. यावर्षी तशी स्थिती झाल्यास महाराष्ट्राला जबाबदार धरण्याची मागणी करण्यात आली आहे. मार्च महिन्यात ज्यावेळी पाण्याची गरज होती, त्यावेळी शिष्ठमंडळांकडून महाराष्ट्रातील नेत्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले होते. याची गंभीर दखल घेत महाराष्ट्राने पाणीही सोडले होते. 

अनाठायी मागणी 
आता मात्र महाराष्ट्रात पाणी पातळी वाढल्याने दरवर्षीप्रमाणे कर्नाटकात पाणी सोडले जात असल्याने त्याची दखल घेत कन्नड संघटनेकडून महाराष्ट्राला जबाबदार धरण्याची अनाठायी मागणी करण्यात येत आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kannad organisation letter to Karnataka Chief Minister