कऱ्हाड बसस्थानकासमोर मनमानीला जोर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

सिग्नलखालीच वडापचा थांबा  
कऱ्हाड बस स्थानक परिसरात आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोरील सिग्नलच्या खालीच रिक्षांचा आणि वडापच्या वाहनांचा थांबा आहे. राजरोसपणे तेथे वडाप वाहने आणि रिक्षा थांबवून प्रवाशांची चढ-उतार केली जाते. त्यामुळेही वाहतुकीवर मोठा ताण येतो. आता तेथे वाहने थांबवणाऱ्यांवरही कारवाई करण्याची गरज आहे.

कऱ्हाड - येथील बस स्थानक आणि कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसरात मनमानी पद्धतीने रिक्षा लावल्या जात आहेत. वाहतूक पोलिस तेथे तैनात असतानाही अस्ताव्यस्तपणाचे प्रकार घडत असल्याने वाहतुकीस मोठी अडचण होत आहे. काही रिक्षाचालकांकडून तर मुद्दामपणे रिक्षा आडव्या लावल्या जात आहेत. त्यासंदर्भात नागरिकांनी विचारणा केली तर त्यांना उलट उत्तरे दिली जात आहेत. त्यासंदर्भात आता पालिका, पोलिस आणि आरटीओ यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून बस स्थानक परिसरात बिघडलेल्या वाहतुकीला वळणावर आणण्यासाठी कारवाईचा दंडुका हाती घेणे गरजेचे आहे. 

कऱ्हाड बस स्थानकात दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. अनेकदा प्रवासी ये-जा करण्यासाठी रिक्षांचा वापर करतात. मात्र, स्वतःच्या वाहनाने, दुचाकीने बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. अशा विविध मार्गांनी येणाऱ्या प्रवाशांना बस स्थानकात जाण्यासाठी दररोज अस्ताव्यस्तपणे उभ्या होणाऱ्या रिक्षांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्याच्या परिसरातील रिक्षा व्यावसायिकांचाही उद्योग अशाच प्रकारे चालला आहे. मलकापूर परिसरात जाणाऱ्या रिक्षा तर त्यांचा थांबा सोडून रस्त्यावरच प्रवाशांना घेतात. त्याचबरोबर पुतळ्यासमोरच असलेल्या रिक्षा थांब्यावर अनेकदा रिक्षांच्या दोन दोन रांगा केल्या जातात. तेथेच सिग्नलही असल्याने या सर्व रिक्षांचा अन्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे सर्व वाहतूक पोलिसांच्या समोरच घडत असताना त्यांच्याकडूनही काहीच उपाययोजना होत नसल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आता बस स्थानकाबाहेरील बिघडलेल्या रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी पालिका, पोलिस आणि आरटीओ यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

Web Title: Karad Busstop Rickshaw Issue