कऱ्हाड-चिपळूण लोहमार्गाला खो!

मुकुंद भट
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

ओगलेवाडी - कोकण रेल्वेच्या कोल्हापूर ते वैभववाडी मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्याने व या लोहमार्गाचे काम लवकरच सुरू करण्याचा निर्धार केल्याने अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या कऱ्हाड ते चिपळूण लोहमार्ग होण्याच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने सातारा जिल्ह्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

ओगलेवाडी - कोकण रेल्वेच्या कोल्हापूर ते वैभववाडी मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्याने व या लोहमार्गाचे काम लवकरच सुरू करण्याचा निर्धार केल्याने अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या कऱ्हाड ते चिपळूण लोहमार्ग होण्याच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने सातारा जिल्ह्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

कऱ्हाड- चिपळूण लोहमार्ग होण्यासाठी १४ ऑगस्ट २०१६ रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री अनंत गीते आदींच्या उपस्थितीत १०४ किलोमीटर अंतराच्या व एक हजार कोटी रुपये खर्चाच्या कामाचा करार शापरजी पालोनजी कंपनीशी झाला होता. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या करार थेट जनतेला पाहायला मिळावा म्हणून कऱ्हाड व चिपळूण रेल्वे स्थानकात त्याचे प्रक्षेपणही केले होते. या लोहमार्गाच्या कामाचा करार झाल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मंत्री सुरेश प्रभू यांनी तेव्हाच्या अर्थसंकल्पात १२०० कोटी रुपयांची तरतूदही केली होती. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने ४६४ कोटी रुपयांची तरतूद केली होती; पण नंतर शापरजी पालोनजी कंपनीशी झालेला करार रद्द झाला आणि कऱ्हाड ते चिपळूण लोहमार्ग होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. 

कऱ्हाड ते चिपळूण लोहमार्गाचे काम सुरू करण्याऐवजी रेल्वे मंत्रालयाने कोल्हापूर- वैभववाडी लोहमार्गाच्या कामाला अधिक प्राधान्य दिले आहे. या लोहमार्गाच्या कामाला जिल्ह्यातील जनतेचा विरोध नाही. मात्र, कऱ्हाड- चिपळूण लोहमार्गाचे काम सुरू होण्यापूर्वीच रखडल्याने जिल्ह्यातील जनतेत नाराजी आहे. कऱ्हाड- चिपळूण लोहमार्ग होणार की नाही आणि कधी होणार या प्रश्‍नाचे उत्तर शासनाने द्यावे, अशी मागणी होत आहे.

सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी कऱ्हाड- चिपळूण रेल्वे मार्गासाठी लोकसभेत विशेष प्रयत्न व पाठपुरावा केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या मार्गाचा सामंजस्य करार करण्यात पुढाकार घेतला होता. रेल्वे मंत्रालय व कोकण रेल्वे महामंडळाने या लोहमार्गासंबंधी भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे.
- नाना खामकर, सामाजिक कार्यकर्ते, कऱ्हाड

कऱ्हाड- इचलकरंजी- बेळगाव या १९१ किलोमीटर अंतराच्या व दोन हजार १०० कोटी रुपये खर्चाच्या नियोजित रेल्वे मार्गाचेही सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार या प्रतीक्षेत लोक आहेत.
- गोपाळ तिवारी, माजी सदस्य, मध्य रेल्वे सल्लागार समिती

Web Title: Karad Chiplun Railwayline Issue