कऱ्हाडला डॉ. इंद्रजित मोहिते यांची ‘एकला चलो रे’ची भूमिका

कऱ्हाडला डॉ. इंद्रजित मोहिते यांची ‘एकला चलो रे’ची भूमिका

कऱ्हाड - कऱ्हाड दक्षिणचा गड जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा वारू चौफेर उधळत आहे. मात्र, या गडातील मोहिते-भोसले युतीतील एक महत्त्वाचे शिलेदार असलेले डॉ. इंद्रजित मोहिते यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका स्वीकारत काँग्रेसची कास धरण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे भाजपला दक्षिण दिग्विजयाच्या रणनीतीत त्यांची ही भूमिका अडचणीची ठरणार आहे.

कृष्णाकाठचा कायापालट ज्यांच्या दूरदृष्टीतून झाला, त्या ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांचे पुत्र डॉ. इंद्रजित मोहिते यांची राजकीय भूमिका काय असणार? याकडे कऱ्हाडसह वाळवा तालुक्‍यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्यात १९८९, २००० व २००५ मध्ये ज्या वेळी सत्तांतरे झाली. त्या सत्तांतरात डॉ. मोहिते व मदनराव मोहिते खांद्याला खांदा लावून लढले. मात्र, सध्या मदनराव मोहिते त्यांच्या सोबत नाहीत, त्यांनी भोसले गटाची कास धरत भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे डॉ. मोहिते यांच्या राजकीय भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. डॉ. मोहिते यांनी अद्यापही तत्त्वाला प्राधान्य दिले आहे. कोणी कितीही राजकीय सोयीची भूमिका घेतली, तरी तत्त्व महत्त्वाचे असल्याचे ते म्हणतात. 

वास्तविक मोहिते व भोसले गटाचे २००७ मध्ये मनोमिलन झाले. त्या वेळी डॉ. मोहिते त्या मनोमिलनाचे किंगमेकर होते. त्या वेळी मदनराव मोहिते यांनी आक्षेप घेत सवतासुभा मांडला होता. २००९ पर्यंत मदनराव मोहिते मनोमिलनात आलेच नव्हते. अखेर २००९ मध्ये मदनराव भोसले-मोहिते मनोमिलनात आले. त्या वेळी कृष्णा कारखान्यात मोहिते-भोसले गट एकत्रित लढला. त्याला आव्हान देत अविनाश मोहिते यांच्या गटाने २०१० मध्ये सत्तांतर घडवले. त्यामुळे पुन्हा मनोमिलन विसंवादात अडकले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही मोहिते बंधूंनी पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रचार केला. त्यानंतर झालेल्या अनेक राजकीय नाट्यानंतर मदनराव मोहिते-भोसले गटात सामील झाले. डॉ. मोहिते यांनी मात्र तत्त्वाला प्राधान्य देत या पुन्हा हाणाऱ्या मनोमिलनास नकार दिला आहे. तो त्यांनी आजअखेर कायम ठेवला आहे. 

ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांची पुढील वर्षी जन्मशताब्दी आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव मोहितेंप्रेमी रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी डॉ. मोहिते यांनी कऱ्हाड व वाळवा तालुक्‍यांतील निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत जन्मशताब्दीच्या चर्चेबरोबरच ठोस राजकीय भूमिका घेण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. त्या वेळी मनोमिलनात जाणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. त्याला कार्यकर्त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते यशवंतराव मोहिते गट ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांचा भाजपच्या कऱ्हाड दक्षिण दिग्विजयाच्या आगामी राजकारणावर नक्कीच परिणाम होणार आहे. तो कितपत अडथळे आणणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com