कऱ्हाड पालिकेतही घोंघावतेय भाजपचेच वारे ! 

कऱ्हाड पालिकेतही घोंघावतेय भाजपचेच वारे ! 

कऱ्हाड  ः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कऱ्हाड पालिकेतील अनेक नगरसेवक भाजपच्या उंबरठ्यावर आहेत. भाजपचे सहयोगी म्हणून काम करणाऱ्या नगरसेवकांचा लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. पालिकेतील गटनेते व यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांनी त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचा रविवारी (ता. आठ) मेळावा घेतला आहे. कार्यकर्त्यांचा कौल घेऊन तेही प्रवेशाबाबत अंतिम निर्णय काय घेणार, याकडेही लक्ष लागून आहे. श्री. यादव यांच्याशिवाय उपाध्यक्ष जयवंत पाटीलही भाजपशी सलगी ठेवून आहेत. दोन्ही नेते वेगवेगळ्या मार्गाने भाजपच्या संपर्कात आहेत. त्यात पालिकेत नगराध्यक्षा भाजपच्या आहेत. त्यामुळे कऱ्हाड पालिकेतही भाजपचेच वारे घोंघावत आहे. 

विधानसभा निवडणुकीमुळे शहरातील वातावरण तापू लागले आहे. भाजपनेही माजी मुख्यमंत्री, विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना कोंडीत पकडण्याची खेळी केली आहे. त्यात भाजपने पूर्ण ताकद लावली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट विठ्ठल-रुक्‍मिणी मंदीर समिती ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांची उमेदवारी येथे जाहीर केली आहे. त्यामुळे हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कऱ्हाड पालिकेच्या राजकारणावर त्याच परिणाम होणार आहे. पालिकेतील यशवंत जनशक्ती आघाडीचे अनेक नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. त्या प्रत्येकाशी वेगवेगळा संवाद साधून भाजपने ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही कोणीही, काहीही बोलण्यास तयार नाही. भाजपतर्फे नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी महिलांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. त्यांनी अतुल भोसले यांच्या आई उत्तरा भोसले यांच्या उपस्थितीत महिला मेळावाही घेतला. त्यामुळे भोसले गटही सामान्यांसह नगरसेवकांच्या संपर्कात आहे. निवडणुका झाल्यापासून पालिकेचे विद्यमान उपाध्यक्ष जयवंत पाटील भाजपशी सलगी ठेवून आहेत. भाजपला अपेक्षित निर्णय कसे घेता येतील, याची काळजी त्यांनी घेतल्याचे दिसते. त्यामुळे उपाध्यक्ष भाजच्याच संपर्कात आहेत. त्यांची भाजपचे अतुल भोसले यांच्याशी असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांनी भाजपच्या संपर्कात नव्या राजकीय खेळ्या करण्यास सुरवात केली आहे. पालिकेतील बहुतांशी नगरेसवक आमदार चव्हाण यांच्यापासून दुरावले आहेत. मात्र, चव्हाण यांच्या गटाकडून अद्यापही त्यापैकी कोणाशी संपर्क साधल्याचे दिसत नाही. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आप्पा मानेही "जनशक्ती'चे नगरसेवक आहेत. ते तेवढे आमदार चव्हाण गटाकडे सक्रिय आहेत. नगरसेविका स्मिता हुलवान याही आमदार चव्हाण यांच्या गटाच्या आहेत. आमदार चव्हाण गटाकडे त्या फारशा सक्रिय दिसत नाहीत. या सगळ्यांचा विचार करून आमदार चव्हाण गटाला पुढील खेळी आखावी लागणार आहे. 

राजेंद्र यादव यांनी संवाद मेळाव्याच्या निमित्ताने पक्ष प्रवेशाबाबतची चाचपणी सुरू केली आहे. आमचे निर्णय हीच आमची ओळख, असे राजकीय ब्रीद घेऊन पालिकेच्या राजकारणात निर्णायक ठरणारा यादव गट रविवारी मेळाव्याच्या निमित्ताने ताकद दाखविणार आहे. त्यामुळे त्यांच्या नेमक्‍या हालचाली काय असतील, याकडे लक्ष लागून आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून श्री. यादव यांचा परिचय आहे. खासदार भोसले यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. श्री. यादव यांनी 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रचार केलेला होता. मात्र, त्यानंतर यादव गट चव्हाण यांच्यापासून दुरावला. त्यांनी मलकापूरच्या निवडणुकीतही तटस्थ राहून भाजपचाच प्रचार केला होता. शेवटच्या सांगता सभेला प्रत्यक्ष व्यासपीठावर उपस्थिती लावून राजेंद्र यादव यांनी थेट विरोधाचे संकेत दिले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांनी खासदार उदयनराजे यांचा प्रचार केला. त्यावेळी राष्ट्रवादी व कॉंग्रेसशी त्यांचा पुन्हा संपर्क आला आहे. मात्र, दिवसागणिक बदलणाऱ्या राजकीय वातावरणात नेमका काय निर्णय घ्यावा, याचा कौल घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला आहे. रविवारी पालिकेच्या बहुद्देशीय हॉलमध्ये दुपारी 12 वाजता जाहीर मेळावा घेऊन कार्यकर्त्यांचा कौल लक्षात घेऊन श्री. यादव निर्णय घेणार आहेत. निर्णय काहीही होणार असला तरी आतापर्यंतच्या यादव गटाच्या हालचाली भाजपच्याच बाजूने असल्याने त्या मेळाव्यातही त्याच बाजूचाच कौल होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 


 

आमदार चव्हाणांपासून "जनशक्ती' का दुरावली ? 

पालिकेच्या निवडणुकीत यशवंत जनशक्ती आघाडीने आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानून पालिकेच्या 2016 मध्ये झालेल्या निवडणुका लढविल्या. मात्र, त्या निवडणुकीत "जनशक्ती'च्या नगराध्यक्षांचा पराभव करून भाजपच्या नगराध्यक्षांनी विजय मिळवला. मात्र, बहुमत "जनशक्ती'चे आले. त्यातही राजेंद्र यादव यांचा पराभव झाला. "गड आला पण, सिंह गेला' अशी अवस्था झालेली "जनशक्ती' त्यानंतरच्या अवघ्या काही दिवसांतच आमदार चव्हाण यांच्यापासून दुरावली. ती का दुरावली, याचे कारण अद्यापही सांगितले जात नाही. आमदार चव्हाण यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी विश्वासघात केला, असे प्रत्यक्षपणे अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. त्यालाही कोणीही उत्तर दिलेले नाही. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com