#SataraFlood कराड पालिकेने 50 लाेक सुरक्षित स्थळी हलविले

सचिन शिंदे
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

शहरातील दोनशे कुटूंबातील एक हजार लोक अद्यापही विविध शाळांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.

कऱ्हाड ः शहरातील बाजारपेठेत पाणी असल्याने आज (बुधवार) सलग तिसऱ्या दिवशीही बाजारपेठेतील उलाढाल ठप्पच हाेती. शहरातील सुमारे चाळीस टक्के भाग पाण्याखाली होता. येथील वाखाण भागात कृष्णेचे पाणी काल सायंकाळनंतर अचानक वाढले. त्यामुळे पटेल लॉन परिसरातील अपार्टमेंट व बंगलोजमध्ये अडकलेल्या सुमारे पन्नास लोकांची सुरक्षीत सुटका पालिकेने केली. त्या भागात सहा फुटापेक्षा जास्त पाणी आहे. त्यामुळे पटेल लॉन्स पासून पलीकडे अडकलेल्या नागीरकांची रात्री उशिरापर्यंत बोटीतून सुटका करण्यात आली.
कृष्णा नदीच्या पाण्याचा विळखा वाखाण भागाला बसला आहे. तेथे काल सायंकाळनंतर पाण्याचा शिरकाव वाढला. किमान सात फुट पाणी वाखाण भागात पटेल लॉन्ससह त्या भागातील नागरी वस्तीत शिरले आहे. तेथे राहणाऱ्या बंगलोजमधील लोकांनी पालिकेने काल रात्री अकराच्या सुमारास मोठी कसरत करून बोटीतून बाहेर काढले आहे.
पालिकेने सुमारे 50 लोकांची सुटका तेथून केली. त्यात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरीकांचाही त्यात समावेश होता.
यावेळी नगरसेवक सौरभ पाटील, विजय वाटेगावकर, प्रितम यादव, जयंत बेडेकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱी यांनी त्यासाठी अथक प्रय़त्न केले. तेथून शिरलेलेले पाणी रूक्मीणीनगर भागाकडे वळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे त्या भागातील नागरीकांनाही सुरक्षीत स्थळी रात्रीच हलविण्यात आले आहे.
दरम्यान दत्त चौकालाच पाण्याचा वेढा पडल्याने शहरात येणारा शेवटचा मार्गही बंद आहे. सकाळी काही प्रमाणात पाणी ओसरू लागले होते. यापूर्वी कऱ्हाड ते विट्याला जोडणारा नविन कृष्णा पूल शासनाने खबरदारी म्हणून बंद केला होता. तो सकाळी हलक्या चार चाकी व दुचाकीसाठी खुला केला आहे. पुराचा पालिकेच्या पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. आज (बुधवार) सायंकाळचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad municipality moves 50 citizens in safer place