देशातील सर्वाधिक पटसंख्येचा मान

कऱ्हाड - पालिका शाळा क्रमांक तीनची इमारत.
कऱ्हाड - पालिका शाळा क्रमांक तीनची इमारत.

कऱ्हाड - स्पर्धात्मक युगात खासगी शाळांपुढे शासनाच्या शाळांचा टिकाव लागणे मुश्‍कील झालेले असताना येथील पालिकेच्या शाळा क्रमांक तीनने गुणवत्ता आणि दर्जा टिकवत पालकांच्या विश्‍वासाच्या जोरावर राज्यात नव्हे तर देशातील सर्वाधिक पटसंख्या असलेली शाळा म्हणून नावलैकिक मिळवला आहे. राज्यातील पालिका शाळांत सर्वप्रथम ‘आयएसओ’ मानांकन मिळवण्याचा मानही या शाळेच्या नावावर आहे. नवनवीन उपक्रमांमुळे राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागासाठी ‘रोल मॉडेल’ ठरलेल्या या शाळेच्या एकूणच यशात मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांचा सिंहाचा वाटा आहे. 

सुरवातीला २६७ पटसंख्या असलेल्या या शाळेचा संख्यात्मक व गुणात्मक दर्जा वाढवण्याचे आव्हान घेत श्री. कोळी यांनी काम सुरू केले. पटसंख्या वाढीसाठी शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत श्री. कोळी यांनी घरोघरी जावून पालकांना शाळेचे महत्त्व पटवून दिले. त्यात प्रामुख्याने झोपडपट्टीमधील पालकांवर लक्ष केंद्रित केले. २०११ मध्ये शाळेचा एक विद्यार्थी राज्याच्या शिष्यवृत्ती यादीत चमकला. त्याचा प्रचार व प्रसार केल्याने हळूहळू पालिका शाळेतही चांगले शिक्षण दिले जाते, असा संदेश गेला. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील पालकांचा या शाळेकडे ओढा वाढला. श्री. कोळी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणसेवकांनी घेतलेल्या परिश्रमामुळे २०१३ मध्ये १२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकल्याने पुढच्या वर्षात १०० ने पटसंख्या वाढण्यास मदत झाली. २०१४ च्या गुढीपाडव्याला प्रवेश प्रक्रियेसाठी तर शाळेसमोर अर्ज घेण्यासाठी पहाटेपासूनच रांग लागली. शाळेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन श्री. कोळी यांनी शाळेची अंगणवाडी सुरू केली. पहिलीचा पट वाढण्याच्यादृष्टीने २०१५ मध्ये हा निर्णय घेतला.

पहिल्या वर्षी ४० विद्यार्थी मिळाले. मात्र, विनाअनुदानितमुळे पालकांनी दर महिना दहा रुपये देण्याचा निर्णय घेतला. आज अंगणवाडीचा पट ६६६ आहे. पटसंख्या वाढत असताना शिक्षकांची संख्या अपुरी पडू लागली. मंजूर ४१ शिक्षक असताना समायोजन न झाल्याने समाजाच्या मदतीतून ३० शिक्षक मानधन तत्त्वावर नेमण्यात आले. मानधन तत्त्वावर नेमलेल्यांसह सर्वच शिक्षक शाळेची गुणवत्ता टिकवण्यासाठी झोकून देत काम करत आहेत. त्यामुळे यावर्षी राज्यातील नव्हे तर देशात सर्वाधिक २१०० पटसंख्या असलेली कऱ्हाड पालिकेची शाळा क्रमांक तीनचा उल्लेख झाला आहे. शाळेची गुणवत्ता व पटसंख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने मुख्याध्यापक श्री. कोळी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे. राज्यासह परराज्यातील शाळा या शाळेला भेट देवून यशस्वितेचे गमक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. पालकांच्या सहकार्यातून शाळेची झालेली प्रगती पाहून थक्क होतात.

प्राथमिक शाळेत...
 वातानूकुलित सभागृह
 मुख्याध्यापक कक्ष
 सीसीटीव्हीने व्यापलेला परिसर 
 डिजिटल क्‍लासरूम 
 अधिकाऱ्यांच्या पाल्यांचा प्रवेश
 स्कूल बसची व्यवस्था

‘शाळेच्या गुणात्मक दर्जाबाबत कोणतीही तडजोड न ठेवता सांघिकपणे काम केल्यास निश्‍चित यश मिळते. त्यासाठी पालकांचा विश्‍वासही महत्त्वाचा आहे. त्या जोरावरच पटसंख्येबाबत शाळा क्रमांक तीन राज्यात नव्हे तर देशात ‘कऱ्हाड पॅटर्न’ म्हणून ओळखली जाते.’’
- अर्जुन कोळी, मुख्याध्यापक, पालिका शाळा क्रमांक तीन, कऱ्हाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com