बनसोडे यांचा सन्मान आयुष्यभर कलेसाठी वेचलेल्या कष्टाचा परिपाक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

मंगला बनसोडे यांनी पाच पिढ्या तमाशा ही कला जतन करण्याचे काम करुन समाजाची सेवा करण्याचा वसा घेतला आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक संकटे पार करुन कला जीवंत ठेवली. त्यामुळेच त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला

कऱ्हाड  ः लोकसंस्कृतीच्या कलेची कदर राष्ट्रपतींनी करुन मंगला बनसोडे यांचा केलेला सर्वोच्च नागरी सन्मान आयुष्यभर कलेसाठी वेचलेल्या कष्टाचा परिपाक आहे. लोकसंस्कृती टिकावी यासाठी त्यांच्या माध्यमातुन नवीन कलाकारांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था त्यांनी करावी, असे आवाहन प्रांताधिकारी हिंम्मत खराडे यांनी केले. 

केंद्रीय सामाजिक न्याय व हक्क मंत्रालयाच्यावतीने दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगला बनसोडे यांचा कलेतील योगदानाबद्दल वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कार देवुन सन्मानीत करण्यात आले. त्याबद्दल शासनाने त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रांताधिकारी श्री. खराडे, पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे, तहसीलदार राजेंद्र शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, मुख्याधिकारी यशवंत डांगे, निवासी नायब तहसीलदार अजित कुऱ्हाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

पोलिस उपाधिक्षक श्री. ढवळे म्हणाले, तमाशा कलावंतांना त्रास देणे हा पोलिसांचा हेतु नसतो. मात्र कायदा व सुव्यवस्थेच्या कामासाठीच ती कार्यवाही सुरु असते. यापुढे पोलिसांकडुन कोणताही त्रास होणार नाही. मंगला बनसोडे यांनी पाच पिढ्या तमाशा ही कला जतन करण्याचे काम करुन समाजाची सेवा करण्याचा वसा घेतला आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक संकटे पार करुन कला जीवंत ठेवली. त्यामुळेच त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला. तहसीलदार श्री. शेळके, मुख्याधिकारी श्री. डांगे यांनी तमाशाबद्दलच्या आठवणी सांगुण त्यांना शुभेच्छा दिल्या. सौ. बनसोडे यांनी सत्कारास उत्तर दिले. गटविकास अधिकारी श्री. फडतरे यांनी आभार मानले. .

Web Title: karad news: art mangala mansode