काँग्रेसअंतर्गत बंडाळीमुळे ‘राष्ट्रवादी’ चार्ज

हेमंत पवार
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

कऱ्हाड - काँग्रेस पक्षाच्या खच्चीकरणाला काँग्रेस पक्षांतर्गत बंडाळीच कारणीभूत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थकांमध्ये अंतर निर्माण झाल्याने पक्षांतर्गत बंडाळी वाढली आहे. जिल्हास्तरांवरील निवडणुकांत पक्षांतर्गतच कटकारस्थानांचा फटका यापूर्वीच्या निवडणुकांत काँग्रेसला बसला. त्याचीच पुनरावृत्ती नियोजन समितीच्या निवडणुकीत झाली. बुडत्याचा पाय खोलात अशी काँग्रेसची स्थिती होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ‘चार्ज’ झाल्याचे दिसत आहे.

देशात व राज्यात अनेक वर्षे सत्ता कायम राखलेल्या काँग्रेसला सध्या आपली ठाणी राखताना नाकीनऊ आले आहे. भाजपचा वारू रोखताना काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांची दमछाक होत आहे. श्री. चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार आनंदराव पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्यात व आमदार जयकुमार गोरे यांच्यातील दरी परिणामकारक ठरली आहे. जयकुमार गोरे यांच्यासारख्या नेत्याची जिल्हा काँग्रेसच्या प्रमुखपदी गरज आहे, असे वक्तव्य करून ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले 

आहे. जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत श्री. पाटील आणि श्री. गोरे यांनी पक्ष निरीक्षकांसमोरच आपापल्या ताकदीचे दर्शन घडवण्याचे काम केले. त्यातून काँग्रेसअंतर्गत वाद विकोपाला गेल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीतही अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसच्या काही उमेदवारांना बसला. काँग्रेसचे निवास थोरात आणि सुनीता कदम निवडून आले.

त्यांच्या विजयाच्या ‘बॅनर’वर पृथ्वीराज चव्हाण, जयकुमार गोरे, धैर्यशील कदम, भीमराव पाटील यांचे फोटो आहेत. मात्र, जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांचा फोटोच नाही. त्यातूनही पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसते. काँग्रेसअंतर्गत वादाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसने बेरजेचे राजकारण करत जिल्हा नियोजन समितीवरील वर्चस्व कायम राखण्यासाठी केलेली व्यूहरचना यशस्वी झाली. तेथे त्यांना त्यांचा गड राखत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आपले वर्चस्व कायम राखले.

पृृथ्वीराजबाबा निर्णय घेणार का? 
जिल्ह्यामध्ये पृथ्वीराज बाबांचे नेतृत्व सर्वमान्य आहे. मात्र, काँग्रेसअंतर्गत बंडाळी वेळीच रोखली गेली नाही तर काँग्रेसचेच पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती सध्या जिल्ह्यात आहे. येणाऱ्या ग्रामपंचायतींसह अन्य निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचा गड कायम राखायचा असेल, तर अंतर्गत वादावर पडदा टाकायची गरज आहे. त्यासाठी पृथ्वीराज बाबांनी तातडीने तोडगा काढावा, अशी जिल्ह्यातील सामान्य काँग्रेसजनांची मागणी आहे. 

Web Title: karad news congress ncp