विशेष सभा तब्बल दोन तास उशिरा सुरू

सचिन शिंदे 
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

पालिकेच्या सभा वेळवर सुरू होण्यासाठी पदाधिकारी, नगरसेवक व पालिका प्रशासनांची संयुक्त बैठक घेवून निर्णय घेवू. पालिका सभा वेळेवर होत नसल्याचे वारंवार समोर आले आहे. आजचीही विशेष सभा उशीराच सुरू झाली. त्यामुळे पालिकेवर कामाचा ताण पडतो. कामकाज वेळवर होण्यासह वेळेवर सुविधा पुरण्याबरोबर महत्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यासाठी होणाऱ्या सभा भविष्यात ठरेलेल्या तारखेला व वेळेवर झाल्या पाहिजेत, यासाठी ठोस निर्णय घेवू

कऱ्हाड - पालिकेने ड्रेनेज योजनेसाठी कर्ज काढण्यास मंजूरी देण्याच्या ठरावाला बोलवलेली विशेष सभा तब्बल दोन तास उशिरा सुरू झाली. सभा आहे, याचे गांभीर्यच कोणाला नव्हते. पालिकेच्या मासिकसह विशेष सभा वेळेत होत नसल्याचे वारंवार अनुभव येत आहे. मात्र तरिही त्यावर कोणीच काही बोलण्यास तयार नाही.  त्यात घाई गडबडीत सात कोटींच्या कर्जाचा ठराव मंजूर झाला. शहरातील विकासासह सभेच्या बाबतीतही नगरसेवकांनी गांभीर्य येण्याची गरज आहे. सभा वेळेत झाल्या पाहिजेत, यासाठी पालिका प्रशासनानेही त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, मात्र येथे त्याचाच अभाव दिसतो आहे. 

येथील पालिकेच्या सभा वेळेत होत नाहीत, याबाबत वारंवार केवळ चर्चा होते आहे. नेहमीची सभा सायंकाळी पाच वाजता असते. मात्र ती सभा प्रत्यक्षात साडेसहाच्या सुमारास सुरू होते, असा नेहमीचाच अनुभव आहे. यावर काहीतरी व्हायला हव, अशी चर्चा केली जाते. प्रत्यक्षात मात्र कोणीच करावई करावी म्हणून काहीच पावले उचलताना दिसत नाही. आजही तोच अनुभव आला. पालिकेची विशेष सभा बोलवण्यात आली होती. त्या विषय होता ड्रेनेज योजनेसाठी कर्ज काढण्याचा. सकाळी अकराची सभा मात्र प्रत्यक्षात पाऊण वाजला तरी ती चालू झाली नव्हती. नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, लोकशाही आघाडीचे सौरभ पाटील लवकर आले होते. जनशक्तीचे आरोग्य सभापतीसह विजय वाटेगावकरसह काही नगरसेवक लवकर आले होते. साडे अकरा वाजले तरी काही नगरसेवक आलेच नव्हते. काही नगरसेवक एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात गुंतल्याने ते उशिरा येणार होते. त्यासाठी पालिका सभा तब्बल सव्वा तास उशिरा होणार होती. सभा वेळेत होत नसल्याने पालिकेच्या कामाचा बोजवारा उडाला आहे.

शहरातील विविध महत्वपूर्ण विषयांबाबत निर्णय घेण्यासाठी आयोजित केलेल्या सभेसाठी कोणीही सभागृहात लवकर येत नाही, आजही तोच अनुभव आला. सगळे केबिनमध्ये बसले होते. विरोधी लोकशाही आघाडीचे नगरसेवकही ताटकळत बसले होते. सभेची वेळ गेल्यावर तासाभराने रमतगमत पालिकेत येणारे पदाधिकारी दिसले. त्यानंतर तरी बैठक सुरू होईल वाटले मात्र त्यातूनही काहीजणांनी बाहेरच्या एका कार्यक्रमाला उपस्थीती लावली. तेथून फेरफटका मारून आल्यांनतर तासाभराने पुन्हा ते काहीच झाले नाही, अशा आर्विभावात सभागृहाकडे गेले. 

पालिकेच्या सभा वेळवर सुरू होण्यासाठी पदाधिकारी, नगरसेवक व पालिका प्रशासनांची संयुक्त बैठक घेवून निर्णय घेवू. पालिका सभा वेळेवर होत नसल्याचे वारंवार समोर आले आहे. आजचीही विशेष सभा उशीराच सुरू झाली. त्यामुळे पालिकेवर कामाचा ताण पडतो. कामकाज वेळवर होण्यासह वेळेवर सुविधा पुरण्याबरोबर महत्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यासाठी होणाऱ्या सभा भविष्यात ठरेलेल्या तारखेला व वेळेवर झाल्या पाहिजेत, यासाठी ठोस निर्णय घेवू. 

- सौ. रोहिणी शिंदे,  नगराध्यक्षा, कऱ्हाड 

पालिकेच्या मासिक सभेच्या पूर्व नोटीस नगराध्यक्षांच्या सहीने दिली जाते. त्या सभेला प्रत्येक जबाबदार व्यक्तीने वेळेवर येणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. त्यामुळे सभांना वेळ होतो आहे. यापुढे नोटीस दिलेल्या सभा वेळेत होतील, यासाठी प्रयत्न करणार आहे. 

- यशंवत डांगे,  मुख्याधिकारी

पालिकेच्या यापूर्वी झालेल्या सभा 

- 12 जुन - मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या बदीलीची सभा ः वेळ - सकाळी 11.00 - सुरू झाली 12.00 वाजता. 

- 11 सप्टेंबर - जिव्हेशर मंदीर ते पाटण कॉलनी पुलाचा ठराव सभा ः वेळ सकाळी 11.00 वाजता - सुरू झाली 12.30 वाजता.

- 12 ऑक्टोंबर - स्वच्छ सर्व्हेक्शनांच्या कामांसाठी पालिका सभा ः वेळ सकाळी 11.00 वाजता - सुरू जाली. 12.30 वाजता.

- 31  ऑक्टोबर - ड्रेनेजसाठी कर्ज घेण्यास पालिका सभा ः वेळ सकाळी 11.00 वाजता - सुरू झाली 12.45 वाजता.

Web Title: karad news: drainage