बनावट शेतकरी गौप्यस्फोट अंतिम टप्प्यात का? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

कऱ्हाड - सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची कार्यवाही अंतिम टप्यात आलेली असताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आजवर अर्ज दाखल केलेल्यांपैकी दहा लाख शेतकरी बनावट असल्याचे जाहीर करून "बॉंब' टाकला आहे. महसूलमंत्र्यांनी असे विधान करताना "बनावट' म्हणजे काय, हे जाहीर न केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यात कळीचा मुद्दा असा आहे की, अशा नाजूक स्थितीत जबाबदार मंत्र्यांनी असे विधान करावे काय ? असे विधान करण्यामागे त्यांचा नेमका हेतू काय? जर शेतकरी बनावट असतील तर त्यांची यादी तरी जाहीर करावी, मोघम विधाने करू नयेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

कर्जमाफीसाठी झालेल्या अनेक आंदोलनांमुळे आणि त्यातून आलेल्या दबावामुळे सरकारला अखेर कर्जमाफी जाहीर करावी लागली. सरकारने कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्जाची अट घातली. त्यातच ऑनलाइनचा सर्व्हर सारखा डाउन होत असल्याने शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत. तरीही शेतकरी दाम्पत्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून अर्ज भरण्याच्या ठिकाणी 

रांगेत उभे राहून अर्ज भरले आहेत. अजूनही बरेच शेतकरी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ताटकळत आहेत. एकीकडे हे चित्र असताना ज्यांनी अर्ज भरले आहेत, त्यामधील दहा लाख शेतकरी बनावट असल्याचा गौप्यस्फोट महसूलमंत्री श्री. पाटील यांनी काल कोल्हापूर येथे केला. तसेच जे 80  लाख कर्जदार शेतकरी आहेत, त्यांच्या खात्यावर ऑक्‍टोबर अखेरपर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल असेही त्यांनी सांगितले. मात्र, महसूलमंत्र्यांनी टाकलेल्या बनावट शेतकऱ्यांच्या बॉंबने ज्यांनी अर्ज भरले आहेत, ते शेतकरी संभ्रमात आहेत. हा गौप्यस्फोट करताना बनावट शेतकरी म्हणजे काय? हे मात्र या जबाबदार महसूलमंत्र्यांनी जाहीर केलेले नाही. मग यांना वाटले म्हणून शेतकरी बनावट काय ? की असे विधान करण्यामागे आणखी काही गौडबंगाल आहे, की उर्वरित शेतकऱ्यांनी घाबरून जावून कर्जमाफीसाठी अर्ज भरू नयेत असा आहे, हे ही स्पष्ट व्हायला हवे असे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी अशा बनावट शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. 

मुदतवाढीची मागणी 
दरम्यान, अर्ज भरण्यासाठी केवळ तीनच दिवस बाकी राहिले आहेत. असे असतानाही "सर्व्हर'चा सारखा घोटाळा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना मुदतीत आपला अर्ज भरला जाणार का नाही? या बाबत साशंकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशीही मागणी नीलेश भोसले व शेतकऱ्यांनी केली आहे. 

""कर्जमाफीसाठी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यातील दहा लाख शेतकरी बनावट असल्याचे महसूलमंत्र्यांनी जाहीर केले आहे. ते शेतकरी नेमके कोण? याबाबत अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने अशा बनावट शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी.''  
-सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी संघटना, सातारा 

Web Title: karad news fake farmer chandrakant patil