जुन्या कोयना पुलावरून धावणार चारचाकी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

कऱ्हाडच्या ब्रिटिशकालीन पुलासाठी १२५ वर्षांनी दुरुस्ती निविदा; कामास नऊ महिन्यांची मुदत 

कऱ्हाडच्या ब्रिटिशकालीन पुलासाठी १२५ वर्षांनी दुरुस्ती निविदा; कामास नऊ महिन्यांची मुदत 

कऱ्हाड - कोकणातील दळवळणासाठी ब्रिटिशांनी बांधलेल्या जुन्या कोयना पुलाला १०० हून अधिक वर्षे झाली. लोखंडी असलेल्या पुलावरून दुचाकी गेली तरीही तो सध्या हादरत असल्याने त्यावरील चारचाकींची वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, बांधकाम विभागाने संबंधित पुलाच्या दुरुस्तीचे तीन कोटी ६७ लाख ४२ हजार ८३२ रुपये खर्चाची निविदा काढली आहे. नऊ महिन्यांत पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून, त्यावरून चारचाकी वाहन जाईल, एवढा हा पूल मजबूत करण्याचे प्रयत्न आहेत. तब्बल १२५ वर्षांनंतर या पुलाच्या दुरुस्तीसाठी निविदा निघाली आहे. 

ब्रिटिशांनी बांधलेला जुना कोयना पूल अजूनही दुचाकीच्या वापरात आहे. त्यावरून पूर्वी सर्व वाहतूक सुरू होती. मात्र, ब्रिटिशांनीच पुलाला १०० वर्षांहून अधिक काळ झाल्याने तो वाहतुकीस बंद करावा, असे पत्र पाठवल्याचे सांगितले जाते. 

त्यामुळे संबंधित पुलावरून १९७६ पासून चारचाकीसह अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. पण, सध्या दुचाकी गेली तरी तो पूल हादरतो. तो पूल लोखंडी असल्याने त्यामध्ये सस्पेन्शनसाठी बेअरिंगचा वापर करण्यात आला आहे. ती बेअरिंग खराब झाली आहेत. त्याचबरोबर पुलाचे जे चार पिलर कायमस्वरूपी पाण्यात असतात ते झिजले आहेत. ते मजबूत करून पुलाची पूर्ण दुरुस्ती केली तर त्यावरून चारचाकी वाहतूक सुरू होवू शकते, असे मत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सात वर्षांपूर्वी मांडले होते. त्यासाठी संबंधित पुलाच्या दुरुस्तीचा आराखडाही तयार करण्यात आला. बोटीतून आणि पाणबुडीद्वारे सर्व्हे करून झिजलेले पिलर, लोखंडी साहित्य याचा सविस्तर अभ्यास करून तीन कोटींहून अधिक खर्च असल्याचा प्रस्ताव तयार केला. मात्र, निधीअभावी तो गेल्या काही वर्षांपासून धूळखात पडला होता. सध्या बांधकाम विभागाने संबंधित पुलाच्या दुरुस्तीचे तीन कोटी ६७ लाख ४२ हजार ८३२ रुपये मंजूर केले आहेत. त्याची निविदाही काढण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित पुलाचे काम सुरू होणार आहे. त्या पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी नऊ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने पुलाचे काम सुरू करण्यात येईल, असे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘सकाळ’चाही पाठपुरावा 
न्यू कोयना पुलाची दुरुस्ती केल्यानंतर पुलावरून चारचाकी वाहतूक सुरू होवू शकते, असा प्रस्ताव बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी तयार केला होता. त्याचाच संदर्भ घेऊन दै. ‘सकाळ’नेही या प्रश्नी सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करावा, अशी भूमिका घेतली होती. 

वाहतुकीचा ताण होणार कमी 
सध्या कऱ्हाड शहरामध्ये चारचाकीसह अन्य वाहनांना येण्यासाठी कोल्हापूर नाक्‍यावरूनच यावे लागते. त्यामुळे तेथे वाहतुकीचा ताण येवून सातत्याने कोंडीही होते. जुन्या पुलावरून चारचाकीची वाहतूक सुरू झाल्यास शहरात येण्यासाठी वाहनांना दोन मार्ग उपलब्ध होतील. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होईल.

 

Web Title: karad news four wheeler run on old koyana bridge