व्यावसायिक प्राणिपालनाकडे वाढतोय कल

सचिन शिंदे
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

कऱ्हाड - प्राण्यांचा सांभाळ करण्यासाठी वाढलेल्या अत्याधुनिक पद्धती आणि उपलब्ध प्रगतशील उपचार यांमुळे अलीकडच्या काळात व्यावसायिक प्राणिपालनाकडे लोकांचा कल वाढत आहे. सोनोग्राफी, संगणकीय रेडिओग्राफी ते रक्त तपासणीच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे दहा वर्षांत प्राणी सांभाळ करणाऱ्यांमध्ये किमान तीस टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे राज्यात प्राणिपालनाला अत्याधुनिक बाजारापेठेचेही जोड मिळताना दिसते.

भौगोलिक स्थिती, उपलब्ध चाऱ्यासह अन्य सोयी सुविधांमुळे प्राण्यांच्या संगोपनाची प्रथा प्राचीन आहे. मात्र प्राण्यांसाठी उपलब्ध प्रतिबंधात्मक लसी व संगोपनाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झालाय. कुत्रा, मांजर, गाय, शेळी व बैल इत्यादी प्राणी पाळण्याचे राज्यात सर्वाधिक प्रमाण पूर्वीपासून होते. त्यात वाढही होते आहे. मात्र बैलांच्या संगोपनात झपाट्याने घट दिसते. त्यामागे शेतीतील यांत्रिकीकरण महत्त्वाचे कारण आहे. आता बैलाऐवजी मशागती मशिनद्वारे होत आहेत. त्यामुळे बैलांच्या संगोपनामध्ये सुमारे सत्तर टक्के घट झाली आहे. बैलासह अन्य जनावारांसाठीची बाजारपेठ तशी तालुकास्तरावर आहे. त्यातून निवडक जनावरांसाठी अकलूज व बारामती येथे बाजार खुले आहेत.
अलीकडे अश्‍व संगोपनाचा ट्रेंड वाढतो आहे. त्यामागे व्यावसायिकता आहे. रेसकोर्सला लागणारे अश्‍व कमी; मात्र वरातीसह अन्य व्यावसायिक कारणांसाठी अश्‍व सांभाळणाऱ्यांत वाढ दिसते. राज्यात माळेगाव, अकलूजपाठोपाठ सांरगखेड (जि. नंदुरबार) आणि कऱ्हाडलाही मोठा घोडेबाजार भरतो.

राज्यातील गावागावांसह अनेक शहरांत अत्यंत लोकप्रिय प्राणी म्हणजे कुत्रा. कुत्र्याचा सांभाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शौकीन म्हणून कुत्रा सांभाळणारे, शर्यतीसाठीचा आणि शिकारीसाठीचा कुत्रा सांभाळणारे अशा चार प्रकारांत सांभाळ होतो. त्यातही पंधरा जाती आहेत. शौकीन म्हणून लॅब्रेडार, पामेरिन, पग, अल्सेसिएशन, सुरक्षेसाठी डॉबरमॅन, रान्टव्हिलर, शर्यतीसाठी ग्रॅ हंट, पंजाब ग्रे हंट तर शिकारीसाठी कारवान, हंट व पंजाब ग्रे हंट कुत्र्यांना मोठी मागणी आहे.

----

जागतिक प्राणी दिनाविषयी...
जागतिक प्राणी दिनाची संकल्पना सर्वप्रथम जर्मनीतील बर्लिनमध्ये रुजली. तेथील लेखक हेनरिच झीमरमन यांच्या कल्पनेतून ती साकार झाली. झीमरमन यांचे "माणूस आणि कुत्रा' नावाचे मासिक होते. त्यात प्राणिपालनाविषयी यायचे. त्यातून त्यांच्या मनात प्राणिपालनाबाबत उत्सवाची संकल्पना आली. त्यानुसार चार ऑक्‍टोबर 1929 रोजी त्यांनी तो दिवस साजरा केला. त्या वेळी त्यांनी पाच हजार लोकांना आमंत्रित केले. त्यानंतर मे 1931 मध्ये इटलीत त्या संदर्भाने हालचाली झाल्या. तेथे जागतिक परिसंवाद झाला. त्या वेळी जागतिक प्राणी संवर्धन कॉंग्रेसची स्थापना झाली. या परिसंवादात जागतिक पर्यावरण अभ्यासक व प्राणी तज्ज्ञांनी भाग घेतला. त्यानंतर चार ऑक्‍टोबर हा जागतिक प्राणी दिन जाहीर झाला.

-------

काही आधुनिक प्राणिपालन पद्धती

- मुक्त संचार गोठा पद्धत
- स्थानबद्ध शेळी पालन
- मेंढपाळांची पारंपरिक पद्धत
- अश्‍वासाठी स्टडफार्म

प्राण्यांसाठी अत्याधुनिक लसी
- घटसर्प
- फऱ्या
- इटिव्ही
- सीपीआर
- लाळ्या-खुरकूत लस

अत्याधुनिक उपचार पद्धती
- एक्‍सरे तपासणी
- शस्त्रक्रिया
- संगणकीय रेडिओग्राफी
- सोनोग्राफी
- हिमॅटॉलॉजी रक्त तपासणी
- बायोकेमिस्ट्री रक्त तपासणी
- कृत्रिम रेतन पद्धत

प्राणी आणि मानव यांच्यातील संगोपन संवाद सुसंगत व्हावा. त्यांच्या उपचाराच्या व संगोपनाच्या पातळीवर अत्याधुनिकता यावी, यासाठी सरकार चांगल्या पद्धतीने प्रयत्नरत असते. त्यात लोकसहभाग वाढण्याची गरज आहे. प्राण्यांच्या योग्य वेळच्या लसीकरणासह त्यांच्या संतुलित आहाराला महत्त्व द्यावे.
- डॉ. अंकुश परिहार, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग

Web Title: karad news global animal day