कऱ्हाडला अनधिकृत वृक्षतोडीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

कऱ्हाड - पालिकेकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने येथे विनापरवाना वृक्षतोडीचे प्रकार सातत्याने होत आहेत. त्यावर चाप बसवण्यासाठी पालिका आक्रमक केव्हा होणार ? याकडे पर्यावरण व वृक्षप्रेमींचे लक्ष आहे. मात्र, कारवाईबाबत बोटचेपी भूमिका घेत पालिकेकडून होणारा विलंब अनधिकृत वृक्षतोडीला चालना देणारा ठरत असल्याचे बोलले जात आहे. 

कऱ्हाड - पालिकेकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने येथे विनापरवाना वृक्षतोडीचे प्रकार सातत्याने होत आहेत. त्यावर चाप बसवण्यासाठी पालिका आक्रमक केव्हा होणार ? याकडे पर्यावरण व वृक्षप्रेमींचे लक्ष आहे. मात्र, कारवाईबाबत बोटचेपी भूमिका घेत पालिकेकडून होणारा विलंब अनधिकृत वृक्षतोडीला चालना देणारा ठरत असल्याचे बोलले जात आहे. 

वृक्षप्रेमी रोहन भाटे यांनी काही दिवसांपूर्वी पालिकेपासून हाकेच्या अंतरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यालगतचे दोन वृक्ष हे अनधिकृतपणे तोडल्याची तक्रार दिली आहे. यापूर्वी वृक्षप्रेमी चंद्रकांत जाधव, इन्व्हायरोचे अध्यक्ष जालिंदर काशीद, नाना खामकर आदींसह अनेक वृक्षप्रेमींनी अनधिकृत वृक्षतोड होत असल्याच्या घटना पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. मात्र, त्यानंतर कारवाईचा पाठपुरावा पालिकेकडून त्यावर कितपत गांभीर्याने झाला ? हा संशोधनाचा विषय आहे. चार कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवून राज्य सरकार काम करत असताना वृक्षलागवड मात्र बाजूलाच आहे, ती वृक्षसंगोपनाची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली जात नसल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. यावरून वृक्षांबाबतची असणारी आत्मीयता दिसून येते. पालिकेत यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापनाही केली जाते. मात्र, समितीचे केवळ कागदोपत्री काम करण्यापेक्षा खरोखर वृक्षासंबंधी काम होणे गरजेचे आहे. त्यासाठी समितीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांतही वृक्षसंवर्धनासाठी काम करण्याची तळमळ व आवड गरजेची आहे. शहरात गेल्या सहा महिन्यांत रस्त्याच्या कामासह शिवाजी सोसायटी, पोलिस ठाण्यामागील वृक्षतोडीच्या घटना उघडकीस आल्या.

यातील अनेक ठिकाणी पालिकेची परवानगी न घेताच वृक्षतोड झाल्याचे दिसून आले. तरीही अद्याप वृक्षतोडीच्या प्रकाराला खीळ बसलेली नाही. याला कारण पालिकेकडून होत असलेली बघ्याची भूमिका कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. एखाद्या ठिकाणची तक्रार आल्यास त्यावर गांभीर्याने कारवाईचा बडगा न उगारता केवळ नोटीस देवून सोपस्कार उरकण्यावर भर दिला जात असल्याचे समजते. त्यामुळे आतापर्यंत एक-दोन प्रकारांत गुन्हे दाखल केले असते तसेच दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचे धाडस दाखवले असते तर विनापरवाना वृक्षतोडीला आळा बसण्यास निश्‍चितपणे मदत झाली असती. अनेकदा तक्रार देणाराच कारवाईसाठी पाठपुरावा करताना त्यासंबंधीचे कायदे, तरतुदी घेवून पालिकेत हेलपाटे मारत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. मात्र, दंडात्मक अथवा गुन्हा दाखल करण्याच्या कारवाईकडे सोईस्करपणे दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे संबंधित तक्रारदार वाईट व पालिका चांगली, असे चित्र वृक्षतोड करणाऱ्यांपुढे उभे राहते. हे चित्र बदलण्याची गरज आहे. पालिकेने तितक्‍याच गांभीर्याने त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी कटाक्षाने काम करत नसल्याने विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्यांना बळ मिळत आहे. केवळ नोटीस पाठवण्यापलीकडे कारवाई पुढे जात नाही. नागरिकांत विनापरवाना वृक्षतोडीबाबत जरब बसण्यासाठी पालिकेने गुन्हा दाखल करणे, दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.
- रोहन भाटे, वृक्षप्रेमी, कऱ्हाड

Web Title: karad news illegal tree cutting increase