मानापमानात रखडलाय कऱ्हाडचा विकास!

मानापमानात रखडलाय कऱ्हाडचा विकास!

कऱ्हाड - गृहिणी म्हणून जबाबदारी पेलणाऱ्या रोहिणी शिंदे वर्षभरापूर्वी थेट लोकनियुक्त नगराध्यक्षा झाल्या. त्यांच्या रूपाने यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत ‘कमळ’ फुलले. मात्र, कोणताही राजकीय वारसा नसताना ‘गृहिणी ते थेट नगराध्यक्षा’ अशी वाटचाल करणाऱ्या शिंदे यांच्या भाजपकडे अवघे चार नगरसेवक असल्याने त्यांची अल्पमतातील वाटचाल खडतर बनणार हे निश्‍चित झाले. त्यानुसार वर्षभरापासून अल्पमत आणि बहुमताच्या मानापमानात काम करण्याची शिकवण घेत येणाऱ्या अडचणी व त्यामुळे रखडणाऱ्या विकासाला गती न मिळता पहिले वर्ष सरल्याचे दिसून येते. त्यामुळे केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असूनही वर्षभरात नवीन योजना आणणे सोडाच; पण जुन्या अपूर्ण योजनाही पूर्णत्वास नेणे शक्‍य झाले नाही. 

नोव्हेंबर २०१६ च्या पालिका निवडणुकीत प्रस्थापित लोकशाही व जनशक्ती आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांशी टक्कर देताना भाजपच्या उमेदवार रोहिणी शिंदे सरस ठरल्या. 

प्रचारात त्यांनी पक्ष सत्तेसोबत स्वत:ची निर्माण केलेली वेगळी प्रतिमा त्यांना उपयुक्त ठरली. शिवाय त्यांच्या विजयात ‘एमआयएम’च्या उमेदवारीने झालेल्या मतविभाजनाचाही मोठा वाटा आहे. सामान्य कुटुंबातील गृहिणी असलेल्या शिंदे या कऱ्हाडच्या नगराध्यक्षा झाल्या. मात्र, त्यांच्या भाजपचे केवळ चार नगरसेवक असल्यामुळे नगराध्यक्षपद असूनही भाजप अल्पमतातील सत्ताधारी बनले. निवडणुकीनंतर तत्कालीन मुख्याधिकारी, पदाधिकारी, अधिकाऱ्यांतील वादात सहा महिने लोटल्याने शहरातील विकासकामांना गती मिळाली नाही. त्यानंतर मुख्याधिकारी बदलल्याने विकासाला गती मिळण्याची शहरवासीयांची अपेक्षा असतानाच तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना हटवण्यावर एकत्र असणारे भाजप व १६ सदस्यांसह बहुमतात असणारी जनशक्ती आघाडी यांच्यातील मानापमानातून दुरावा वाढत गेला. गेल्या काही दिवसांपासून तो टोकाला पोचला. त्यामुळे नगराध्यक्षा शिंदे यांना विकासकामांपेक्षा शह-काटशहाचे राजकारण व राजकीय कुरघोड्या जवळून पाहता व अनुभवता आल्या. सामान्य महिला म्हणून शिंदे यांना लोकांनी भांडणापेक्षा काम करायला निवडून दिल्याची भावना असली तरी अल्पमतात असल्याने राजकीय कुरघोड्या यापुढेही अनुभवाव्या लागणार, हे निश्‍चित. 

दर मंगळवारी ‘नगराध्यक्षा आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे शिंदे यांनी शहरातील प्रभागातील अडीअडचणी जाणून घेण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला. त्यासाठी त्या-त्या प्रभागात ‘जनशक्ती’चे असोत अथवा ‘लोकशाही’च्या नगरसेवकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजकीय मानापमानाच्या घडामोडीनंतर सध्यातरी शिंदे यांनी हा उपक्रम गुंडाळून ठेवल्याचे दिसते. तो पुन्हा सुरू करण्याचाही त्यांचा मानस आहे. नगराध्यक्षा शिंदे यांनी लोकसंपर्क व कामाच्या माध्यमातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजकारण व समाजकारणात नवीन असूनही काम करण्याची व शिकण्याची आवड असल्याने त्यांचा पुढाकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कऱ्हाड दौऱ्यावेळी नगराध्यक्षा शिंदे यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी शहरातील कामांना निधीची मागणी केली आहे. त्यातील काही निधी मिळाल्याचे सांगण्यातही येत आहे.  

सध्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत सुरू असलेल्या कार्यक्रमात नगराध्यक्षा शिंदे या हिरीरिने सहभागी होतात. शहरात सध्या कचरा वर्गीकरण व घनकचरा प्रकल्पासाठी पालिकेच्या सुरू असलेल्या प्रयत्नात आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांचा सिंहाचा वाटा आहे. नगराध्यक्षा शिंदे यांनीही अनेकदा राजकीय पक्ष, आघाडीचा विचार न करता आरोग्य सभापतींच्या कामाचे कौतुक केले आहे. २४ तास पाणी योजना, वाढीव भागासह शहरासाठीच्या सुधारित भुयारी गटार योजना, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीतील कोल्हापूर नाक्‍यावरील प्रवेशद्वार, कृष्णा नाक्‍यावरील जलतरण तलाव आदी रखडलेली कामे पूर्णत्वास नेवून त्या कामांची उद्‌घाटने करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. वास्तविक पहिल्या वर्षातच ही कामे मार्गी लागून उद्‌घाटने होणे गरजेचे होते. त्यामुळे येणाऱ्या नव्या वर्षात नवी आव्हाने त्या कशा पेलणार, हे महत्त्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com