कऱ्हाडमधून 13 कोटी निघाले परत! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

कऱ्हाड - यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांतर्गत राज्य शासनाने निधी देऊनही अद्याप सुरू न झालेल्या कामांचा निधी शासनाने परत मागवला आहे. त्यासंदर्भात शासन स्तरावरून सुरू न झालेल्या कामाची सविस्तर कारणे व कामाचा निधी कोषागारात जमा करण्यासंदर्भात तसेच अपूर्ण असलेल्या कामांना गती देऊन मार्च 2018 पर्यंत ती पूर्ण करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे कऱ्हाड पालिकेच्या उदासीन भूमिकेमुळे अखेर बहुमजली पार्किंग व प्रशासकीय इमारतीचा तीन कोटी तीन लाखांचा निधी परत जाण्याची शक्‍यता आहे.

कऱ्हाड - यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांतर्गत राज्य शासनाने निधी देऊनही अद्याप सुरू न झालेल्या कामांचा निधी शासनाने परत मागवला आहे. त्यासंदर्भात शासन स्तरावरून सुरू न झालेल्या कामाची सविस्तर कारणे व कामाचा निधी कोषागारात जमा करण्यासंदर्भात तसेच अपूर्ण असलेल्या कामांना गती देऊन मार्च 2018 पर्यंत ती पूर्ण करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे कऱ्हाड पालिकेच्या उदासीन भूमिकेमुळे अखेर बहुमजली पार्किंग व प्रशासकीय इमारतीचा तीन कोटी तीन लाखांचा निधी परत जाण्याची शक्‍यता आहे. तसेच, जागेअभावी रखडलेल्या 1200 आसनक्षमतेच्या प्रेक्षागृहाचाही सुमारे दहा कोटी असा सुमारे 13 कोटींचा निधी परत जाण्याची नामुष्की आली आहे. 

यशवंतराव चव्हाण यांची 2012-13 ला जन्मशताब्दी साजरी होत राज्य शासनाने विविध ठिकाणी कामांसाठी 100 कोटींची तरतूद केली होती. त्यानुसार कऱ्हाड पालिकेला सुमारे 13 कोटींचा निधी प्राप्त झाला. त्याशिवाय शहराबाहेर विद्यानगरला 1200 आसनक्षमतेचे प्रेक्षागृह बांधण्यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी देण्यात आला. 

या निधीतून यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय केंद्र, ऑलिंम्पिकवीर खाशाबा जाधव स्मृतिस्तंभ, कोल्हापूर नाक्‍यावर यशवंतराव चव्हाण प्रवेशद्वार, रुक्‍मिणीनगर येथे जलतरण तलाव, यशवंतराव चव्हाण समाधिस्थळ व प्रीतिसंगम बागेचे नूतनीकरण व सुशोभीकरणाच्या कामास पालिकेने सुरवात केली. मात्र, बस स्थानकाजवळ बहुमजली पार्किंग व प्रशासकीय इमारत बांधण्याच्या कामास अद्याप सुरवात झाली नाही. संबंधित कामासाठी तीन कोटी तीन लाखांचा निधी पालिकेच्या खात्यावर वर्गही झाला आहे. मात्र, राजकीय उदासीनतेमुळे ते काम आजतागायत सुरू होऊ शकले नाही. तत्कालीन मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी त्या जागेवरील शासकीय अतिक्रमणे काढली. मात्र, खासगी झोपड्या काढण्याचे कामच सुरू होऊ शकले नाही. पालिकेच्या 2016 ला झालेल्या निवडणूक प्रचारात हा मुद्दा चर्चेचा ठरला होता. 

दरम्यान, संथ गतीने सुरू असलेले पालिकेचे समाधी परिसराच्या विकासाचे काम तसेच बस स्थानकाच्या विस्तारीकरण व आधुनिकीकरणाच्या कामांना गती देऊन मार्च 2018 पर्यंत ते पूर्ण करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे चार महिन्यांत ही कामे पूर्णत्वास न्यावी लागणार आहेत. 

जागेअभावी रखडले प्रेक्षागृह 
विद्यानगर-सैदापूर परिसरात 1200 आसनक्षमतेचे प्रेक्षागृह उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री चव्हाण यांनी सुमारे 10 कोटींचा निधी मंजूर केला. सार्वजनिक बांधकामच्या विशेष प्रकल्प विभागाकडे हे काम होते. मात्र, सैदापुरातून जागेअभावी हे प्रेक्षागृह मलकापूरला होणार होते. मात्र, तेथेही जागेची तांत्रिक अडचण आल्याची चर्चा आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत कामच सुरू न झाल्याने त्याचाही दहा कोटींचा निधी कोषागारात जमा होणार आहे.

Web Title: karad news karad municipal