कऱहाडः अधिकाऱयाच्या बदलीने राजकीय वातावरण निघाले ढवळून

karad municipal
karad municipal

कऱ्हाड (सातारा): येथील पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या बदलीच्या निमित्ताने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांची बदली व्हावी व होवू नये, अशा दोन्हीसाठी वेगवेगळे राजकीय गट त्यांच्या बाजू सेफ करत सक्रीय झाले आहेत. त्यामुळे श्री. औंधकर यांच्या बदलीच्या मागचा राजकीय शो लोकांच्याही लक्षात येवू लागला आहे. बदलीनिमित्ताने कऱ्हाड दक्षिणच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची राजकीय कोंडी करण्याची खेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यांना राजकीय अडचण आणणारी खेळी खेळली गेल्याने ग्रामीण भागातही बदलीचे प्लस मायनस परिणाम दिसू लागले आहेत.

पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना वेगवेगळ्या कारणाने बदलीसाठी प्रथम पालिकेचे पदाधिकारी, त्यांनतर कामगार सक्रीय झाले. दोन महिन्यापासून तो खेळ रंगत आहे. मात्र, अद्यापही शासन पातळीवर त्याचा ठोस निर्णय झालेला नाही किंवा तो होतानाही दिसत नाही. शासन श्री. औंधकर यांची बदलही करेना किंवा त्यांना कामावर हजर राहण्याचेही आदेशही देईना. त्यामुळे त्या पातळीवर दबावाची पालिकेच्या वर्तुळात चर्चा आहे. शहरातसह ग्रामीण भागातही त्याचे परिणाम व चर्चा रंगली आहे. शासन काहीही निर्णय घेईल, तो भाग वेगळा. मात्र श्री. औंधकर यांच्या बदलीच्या मागे मोठी राजकीय उलथापालथ होत आहेत. या निमित्ताने प्रत्येकजण राजकीय भुमिकांना सावरत आहे. बदली व्हावी, यासाठी भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, उपाध्यक्ष जयवंत पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, यशवंत विकास आघाडीचे राजेंद्र यादव, त्यांचे गटनेते हणमंत पवार यांनी त्यांच्या मागे तगादा लावला आहे. श्री. भोसले यांनी त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा केली आहे. मंत्री खोत यांनी त्याबाबत विक्रम पावसकर यांच्याशीही चर्चा केली आहे. अद्यापही त्यावर निर्णय नाही. मात्र त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्राप्त परिस्थीतीचा राजकीय फायदा घेण्यासाठी रणनिती आखली आहे. वास्तविक आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यात जाधव, यादव व पाटील गट एकत्र येवून यशवंत जनशक्ती लोकसेवा आघाडी स्थापन झाली. मात्र आघाडीचे नेतृत्व करणाऱ्यापैकी राजेंद्र यादव यांचा निवडणुकीत पराभव झाला. तो आघाडीच्या जिव्हारी लागला. त्याचे खापर पृथ्वीराज चव्हाण गटावर फोडून निवडूण आलेल्या पंधरापैकी अकराजण चव्हाण गटापासून बाजूला झाले. एखाद दुसरा नगरसेवक त्या गटाकडे आहे. निवडणुकीत भाजप व माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांची आघाडी आमदार चव्हाण गटाच्या विरोधात होते. त्यात भाजपला नगराध्यसह सहा जागा मिळाल्या. सत्ताधारी अल्पमतात व विरोधक बहुमतात आले. राजेंद्र यादव यांच्या पराभवापासून सुरू झालेल्या राजकीय घडामोडींना गती मिळाली ती श्री. औंधकर यांच्या बदलीच्या मागणीपासून.  

पालिकेच्या नऊ नगरसेवकंवर रस्ता दुभाजक प्रश्नी तक्रारीची ढाल करून भाजपने राजकीय गणित मांडले आहे. त्या दुभाजक प्रकरणात नऊ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्याचा फायदा घेत खेळी आखली गेली आहे. त्यात भाजपचे अतुल भोसले, सहकार परिषदचे अध्यक्ष शेखर चरेगवकर, विक्रम पावसकर यांची नावे पुढे आहेत. अतुल भोसले व जयवंत पाटील यांचे संबंध सर्वज्ञात आहेत. त्यामुळे ते त्यांना त्या फेऱ्यात येवू देणार नाहीत, हे सत्य असले तरी त्यांच्या माध्यमातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय खेळी केल्या आहेत. त्यात पृथ्वीराज चव्हाण गटाला खिळखिळीत करण्यासाठीचे प्रयत्न मोठे आहेत. भाजपही त्यांना रसद पुरवत आहे. रस्ता दुभाजकचा प्रश्न शासन निकालावर आहे. मात्र तो अडीच महिन्यापासून लांबवलेला आहे. तो लांबवलेला निकाल, मुख्याधिकारी औंधकर यांच्याबाबतीत ठोस निर्णय न झाल्याने लांबलेले प्रकरण, कर्मचाऱ्यांनाही निर्णयाचा अंदाज न लागू देणे, जिल्हाधिकारी यांच्यावरही दबावाचा प्रयत्न करणे, या सगळ्यामागे राजकीय प्रेशर असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच अनेक विद्यमान नेते अतुल भोसले, शेखर चरेगावकर यांच्या संपर्कात आहेत. मुख्याधिकारी औंधकर यांची बदली होवू नये, यासाठी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासह त्यांच्या गटाने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे शासनालाही श्री. औंधकर यांच्याबाबत ठोस निर्णय घेताना कोंडी होत असल्याचे दिसत आहे. त्या सगळ्या वातावरणाचा फायदा उठवण्यासाठी भाजप पुढे सरसावले आहे.

वेट अॅण्ड वॉच
माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचा गटही शहरात सक्रीय आहे. तो सध्या सगळ्याच घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. ते भुमिका सावधगिरीनेच घेताना दिसत आहेत. गटाकडून लोकसंपर्क कमी झाल्याचे दाखवत असले तरी युवा नेते उदयसिंह पाटील शहरातील अनेक ठिकाणी उपस्थीती लावत आहेत. त्यामुळे सध्याच्या घडामोडींवर त्या गटाने वेट अॅन्ड वॉचीच भुमिका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com