खाशाबांचे पदक लिलावात काढा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

""ज्या खाशाबा जाधव यांनी देशाला ऑलिंपिकमध्ये पहिले पदक मिळवून दिले, त्यांच्या नावाने होणाऱ्या क्रीडा संकुलाची उपेक्षाच झाली आहे. सरकारने संकुलास जमीन दिली नाही. मी स्वतःची जमीन देऊनही सरकार संकुल उभारणीसाठी उदासीन आहे. 14 ऑगस्टला त्यांची 33 वी पुण्यतिथी आहे. त्याअगोदर सरकारने संकुलाबाबत निर्णय घ्यावा.'' 
रणजित जाधव 

कऱ्हाड - ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिलेल्या खाशाबा जाधव यांच्या नावाने कऱ्हाड येथे होणाऱ्या राष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती संकुलाची उभारणी रखडली आहे. त्यामुळे उद्दिग्न होऊन खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित यांनी संबंधित पदक सरकारने लिलावात काढावे, अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे क्रीडा वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

भारत देशाला खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत पहिले कास्य पदक मिळवून दिले. त्यांच्या रूपाने देशाला पहिले पदक मिळाल्याने त्यांच्या नावाने 1997 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्यांचा गौरव राष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती स्पर्धा सुरू केल्या. सरकारच्या दुर्लक्षामुळे 2015 पासून त्या स्पर्धा झालेल्या नाहीत. त्या स्पर्धांचा दर्जा राष्ट्रीय न ठेवता तो राज्यस्तरीय करण्यात आला. त्याचबरोबर तत्कालीन क्रीडामंत्री दिलीपराव देशमुख यांनी 2009 मध्ये गोळेश्‍वरमध्ये राष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्य सरकारशी विविध टप्प्यात चर्चा झाली. त्यानंतर संकुलासाठी राज्य क्रीडा स्पर्धेचा ठराव झाला. सर्वसंमती झाल्यानंतर संकुलाचा जागेचा प्रश्‍न उद्‌भवला.

रणजित जाधव यांनी त्यावर तोडगा म्हणून स्वतःची जागा जागा संकुलासाठी दिली. त्यानंतर रस्ता रुंदीकरणासह अन्य अडथळे आले. त्यावर श्री. जाधव यांनी पाठपुरावा करून मात केली. बांधकाम विभागाकडून संकुलाच्या जागेसाठी हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर पालकमंत्री असताना मुंबईमध्ये संकुलासंदर्भात बैठक झाली. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना डिसेंबर 2013 मध्ये संकुलासाठी एक कोटी 58 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानंतर संकुलाच्या उभारणीसाठी दोनदा निविदा काढण्यात आल्या. मात्र खर्च वाढल्यामुळे त्याला प्रतिसाद मिळाला नाही. क्रीडा संकुलाबाबत अनेकदा चर्चा झाली. मात्र, कार्यवाही शून्यच झाली. सध्याच्या भाजप सरकारला श्री. जाधव यांनी सातत्याने वाढीव निधीसाठी पत्रव्यवहार केला. अनेकदा भेटून निवेदन दिली. माजी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी वाढीव 3 कोटी निधी मिळावा, असे पत्रही सरकारला दिले आहे. मात्र अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे देशाचा अभिमान असणारे ऑलिंपिकचे पहिले पदक लिलावात काढा, असे पत्र रणजित जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. 

विरोधी पक्ष आवाज उठवणार का? 
राज्य विधिमंडळाचे सध्या अधिवेशन सुरू आहे. देशाला पहिले ऑलिंपिक पदक मिळवून दिलेल्या खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित जाधव यांनी पदक लिलावात काढण्याचे पत्र देऊन उद्विग्नता व्यक्त केली आहे. अधिवेशनात विरोधी पक्ष त्यांच्या मागणीची दखल घेऊन आवाज उठविणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: karad news Khashaba Jadhav