कृष्णा नदीत आता बोटिंगचा थरार!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

कऱ्हाड - महाबळेश्वरच्या वेण्णा लेकसह तापोळाच्या धर्तीवर येथील कृष्णा घाटावर बोटिंग सुरू झाले आहे. शासनाच्या वेगवेगळ्या सहा खात्यांची परवानगी काढून येथे खासगी चार मोठ्या बोट नदीतून सैर करण्यासाठी दाखल झाल्या आहेत. प्रीतिसंगम बोट क्‍लबतर्फे अत्यंत माफक दरात ही संधी उपलब्ध करून दिली आहे. 

कऱ्हाड - महाबळेश्वरच्या वेण्णा लेकसह तापोळाच्या धर्तीवर येथील कृष्णा घाटावर बोटिंग सुरू झाले आहे. शासनाच्या वेगवेगळ्या सहा खात्यांची परवानगी काढून येथे खासगी चार मोठ्या बोट नदीतून सैर करण्यासाठी दाखल झाल्या आहेत. प्रीतिसंगम बोट क्‍लबतर्फे अत्यंत माफक दरात ही संधी उपलब्ध करून दिली आहे. 

येथील प्रीतिसंगमावर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांची समाधी, प्रीतिसंगम बाग, नदीकाठचा परिसर असे स्वच्छ व हवेशीर वातावरण असते. वातावरणाची भुरळ ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांना नेहमीच पडलेली असायची, त्याचा उल्लेख त्यांच्या ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्रातही आहे. ऋतू कोणताही असो, प्रीतिसंगामवरील सायंकाळचे वातावरण प्रसन्न करणारे असते. त्यामुळे येथे मुलांसाठी खेळणीवाले, खाऊचे हातगाडेही आहेत. घोडेसवारी करणारेही असतात. त्यात आता बोटिंगचाही आनंद घेता येणार आहे. लोकांत त्याचा उत्साह दिसत आहे. प्रमोद माने यांनी येथे प्रीतिसंगम बोट क्‍लब स्थापन केला आहे. त्या क्‍लबअंतर्गत चार बोटी कृष्णा नदीची सैर करण्यासाठी आणल्या आहेत. त्यात मोठ्या दोन व लहान दोन बोटींचा समावेश आहे. एक मोठी बोट वगळता अन्य तीन बोट त्यांनी नदीत सोडल्या आहेत. अत्यंत मापक दरात ते बोटिंगची सैर करून देतात. 

सकाळी दहा ते सूर्यास्तापर्यंत बोटिंग सुरू असते. सायंकाळी चारच्या सुमारास कृष्णा घाटावर बोटिंगचा आनंद घेण्यास नागरिकांची गर्दी होत आहे. कऱ्हाडकरांना प्रथमच असा वेगळा आनंद मिळतो आहे. त्यामुळे बोटिंग क्‍लब लोकांसाठी आकर्षण बनले आहे.

बोटिंगसाठी नियमावली...
लाईफ जाकेट घातल्याशिवाय बोटीत बसून दिले जाणार नाही, बोटीत पशू-पक्षी व अन्य साहित्य आणू नये, बोटीत धुम्र व मद्यपानास सक्त मनाई आहे, बोट चालू असताना जागा सोडू नये, मोबाईलवर सेल्फी घेऊ नये, पाण्यात हात घालू नये, खाद्यपदार्थ, प्लॅस्टिक पिशवी किंवा पाणी प्रदूषित होईल, असे काहीही पाण्यात टाकण्यास सक्त मनाई आहे, अशा स्वरूपाचे नियम आहेत.

Web Title: karad news krishna river boating