‘एलईडी’च्या अडीच कोटींवर संक्रांत

सचिन देशमुख
बुधवार, 17 जानेवारी 2018

कऱ्हाड - शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरात एलईडी दिवे बसविण्यासाठी मंजूर झालेल्या अडीच कोटी निधीवर शासनाच्या नव्या निर्णयाने संक्रांत आली आहे. निधी मंजुरीला दीड वर्ष होऊनही प्रक्रियेला गती न मिळाल्याने ‘एलईडी’चा तोंडचा घास जाण्याची पालिकेवर नामुष्की आली आहे. 

शासनाने राज्यातील पालिकांसाठी विविध कामांसाठी २४ ऑगस्ट २०१६ रोजी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील निधी मंजूर केला. त्यातील येथील पालिकेला शहरात एलईडी दिवे बसविण्यासाठी अडीच कोटी निधी उपलब्ध असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडून ३० जानेवारी २०१७ रोजी पालिकेला प्राप्त झाले.

मात्र, एलईडीचे काम पालिकेच्या यंत्रणेकडून न करता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत असल्यामुळे त्यांच्या कासवगतीमुळे वर्षानंतर गेल्या आठवड्यात या कामाची निविदा काढण्यात आली. अद्याप ती प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे त्याचे काम सुरू आहे. अडीच कोटींत पालिकेने बांधकाम विभागाकडे सुमारे पाच हजार एलईडी दिवे बसविण्याची मागणी केली होती. मात्र, सार्वजनिक बांधकामकडून एक हजार ४६० एलईडी दिवे, कोल्हापूर नाका ते कृष्णा नाक्‍यादरम्यानच्या मार्गावरील दुभाजकात खांब व त्यावर दिवे बसविण्यासह शहरातील काही मुख्य रस्त्यांवरील विजेच्या दिव्यांसह खांब बसविण्याचे काम घेण्यात आले आहे. या कामाची निविदा नुकतीच काढण्यात आली. त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. 

दरम्यान, ‘एलईडी’च्या दिव्यांनी शहर उजळण्याची चिन्हे असताना शासनाच्या नगरविकास विभागाने १२ जानेवारी रोजी घेतलेल्या निर्णयानुसार नागरी स्वराज्य संस्थांनी एलईडी पथदिव्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून खर्च न करण्याबाबत निर्णय घेतल्याचे निर्देश दिले आहेत. या शासन निर्णयात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांना यापूर्वी एलईडी दिवे बसविण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी मंजूर असेल. मात्र, अद्यापपर्यंत त्या कामाचा कार्यादेश (वर्कऑर्डर) देण्यात आली नसेल, तर त्यावर खर्च करू नये, असे नमूद करून या निधीतून हाती घ्यावयाच्या सुधारित कामांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे येथील पालिकेच्या एलईडी दिव्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी मंजूर होऊनही सार्वजनिक बांधकामकडून गती न मिळाल्याने अद्यापपर्यंत कार्यादेश न मिळाल्याने एलईडीचे दिवे बसविण्याचे स्वप्न राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे शासनाच्या नव्या निर्णयानुसार या निधीतून पालिका नवीन काम हाती घेणार, की एलईडी दिवे बसवून शहर उजळणार? याकडे लक्ष लागून आहे.

कामांना गती हवी...
कऱ्हाड पालिकेच्या विकासकामांना सत्तांतरानंतरही गती मिळाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दींतर्गत मिळालेल्या निधीतून बस स्थानकासमोर उभारण्यात येणारे बहुमजली पार्किंग, कार्यालय इमारतीचा निधी खर्चाअभावी परतीच्या वाटेवर आहे. त्यातच दीड वर्षापासून निधी मंजूर होऊनही अद्याप पालिकेच्या कामावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे एलईडीचे काम देऊनही त्याला गती न मिळाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: karad news led fund 2.5 crore issue