मोबाईलचोर टोळीचा कऱ्हाडात धुडगूस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

बाजारादिवशीच्या घटनांमध्ये वाढ; पोलिस दरबारी केवळ कच्च्या नोंदी 

बाजारादिवशीच्या घटनांमध्ये वाढ; पोलिस दरबारी केवळ कच्च्या नोंदी 
कऱ्हाड - येथील बाजारपेठेत सराईत मोबाईल चोरट्यांच्या टोळीने धुडगूस घातला आहे. बाजारादिवशी महिलांच्या मोबाईल संचासह पर्सवर डल्ला मारला जात आहे. पोलिसात त्याची कच्ची नोंद घेऊन चोऱ्यांच्या घटनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मोबाईल चोरीच्या घटना गहाळ म्हणून नोंदवून त्या चोऱ्या कागदोपत्री फिरवण्याचा धक्‍कादायक प्रकार पोलिसांकडून सुरू आहे. मोबाईलच्या तपासातील निष्क्रियता चव्हाट्यावर येऊ नये म्हणून पोलिसांचा हा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. सहा महिन्यांत किमान दीडेशवर मोबाईल संच चोरीस गेले असूनही त्याची केवळ गहाळ म्हणून नोंद केली जात आहे. 

रविवार व गुरुवार असे दोन बाजाराचे दिवस आहेत. त्याशिवाय अन्य दिवशीही बाजारात खरेदीसाठी लोकांची गर्दी असते. त्यात महिलांना टार्गेट करून त्यांच्या मोबाईल संचावर डल्ला मारण्याचे प्रकार येथे होत आहेत. बाजारात खरेदी करणाऱ्या महिलांच्या मोबाईलसह पर्सही हातोहात लंपास करून चोरटेही पोबारा करत असल्याच्या घटना ताज्या आहेत. त्याचा तपास लागण्याआधीच लगेच दुसऱ्या चोऱ्या पोलिसांपुढे येत आहेत. 

महिलांचे हजारो रुपये किंमतीचे मोबाईल संच चोरीस जात असताना पोलिस त्याची दखल घेताना दिसत नाहीत. गुन्हे प्रकटीकरण विभागाचा एकही कर्मचारी त्या घटनेच्या खोलात जाताना दिसत नाही. बाजारात चोरीच्या घटना घडत असल्याच्या तक्रारीवरूनही पोलिस जागे होताना दिसत नाहीत. मागच्या बाजारादिवशी तब्बल चार संच चोरीस गेल्याचे वास्तव असतानाही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. सराईत चोरट्यांचे रॅकेटच येथे कार्यरत झाले असताना पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे बाजारात असुरक्षित वातावरण तयार होत असल्याचे दिसत आहे. 

चोरीस नव्हे, हरवला म्हणा...
बाजारातील चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्या गांभीर्याने घेऊन त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सक्षम पर्याय शोधण्याची गरज आहे. मोबाईल चोरीला गेला तरीही तो हरवला असल्याचा उल्लेख करण्याचा फतवा पोलिसांकडून संबंधितासाठी काढला जात आहे. त्यामुळे असेही प्रकार बंद व्हायला हवेत.

Web Title: karad news mobile theft gang in karad