ऑनलाइन सातबाराची जुळवाजुळव सुरूच!

हेमंत पवार
सोमवार, 31 जुलै 2017

डेडलाइन उद्यावर; मोठ्या शहरांतील काम अजून बाकी, मुदतवाढीची गरज 

डेडलाइन उद्यावर; मोठ्या शहरांतील काम अजून बाकी, मुदतवाढीची गरज 

कऱ्हाड - सातबारातील चुका सुधारून शेतकऱ्यांना तत्काळ तो उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने ऑनलाइन सातबारा एक ऑगस्टपासून सुरू करण्याचे धोरण आखले आहे. त्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून तलाठी, मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदारांमार्फत दिवसरात्र काम सुरू आहे. अजूनही मोठे तालुके, शहरांतील सातबारा जुळवून त्यातील नावे बरोबर करण्यासाठीचा खटाटोप सुरूच आहे. ‘सॉफ्टवेअर’मधील काही दोषांमुळेही दुरुस्ती, बदल करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. त्यामुळे एक ऑगस्टला सरसकट ऑनलाइन सातबारा तयार होणे अवघड बनले असून, त्यासाठी मुदतवाढ द्यावी लागेल असे दिसते. 

सातबारातील फेरफार, एकाचा सातबारा असताना जमीन दुसऱ्यालाच विकणे, दुसऱ्याचीच नावे सातबाराला लागणे यासह अन्य गैरप्रकारांना आळा बसून शेतकऱ्यांना बिनचूक, हवा तेव्हा सातबारा उपलब्ध व्हावा यासाठी शासनाने ऑनलाइन सातबारासाठी चार वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केला. आघाडी सरकार असताना त्यांच्या काळात कऱ्हाडसह काही तालुक्‍यांत त्याचा श्रीगणेशा झाला. त्यानंतर सरकार बदलले. त्यामुळे काहीकाळ त्याला ‘ब्रेक’ मिळाला. त्यानंतर पुन्हा नव्या सरकारने पूर्वीच्या ‘सॉफ्टवेअर’मध्ये काही बदल करून पुन्हा नव्याने ऑनलाइन सातबारासाठी कार्यवाही सुरू केली.

त्यादरम्यान पुन्हा काही अडचणी निर्माण झाल्या. त्या सरकारकडून सोडवल्या न गेल्याने तलाठी, मंडलाधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले. त्यानंतर त्यामध्ये काही बदल करून पुन्हा शासनाने कालबध्द कार्यक्रमाची आखणी करून एक आराखडा तयार केला. त्यानुसार शेतकऱ्यांच्या सातबाराचे चावडी वाचन, हरकती, त्यावर सुनावणी आणि अंतिम ऑनलाइन सातबारा असा कार्यक्रम आखण्यात आला. त्यानुसार कार्यवाही पूर्णत्वाकडे आली आहे. मात्र, अजूनही मोठे तालुके, शहरांतील नावांसह सातबारा जुळवण्याचे घोंगडे बाकी राहिले आहे. गेले पाच महिने ऑनलाइन सातबाराच्या कामासाठी तलाठी, मंडलाधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदारांमार्फत दिवसरात्र काम सुरू आहे. मात्र, तरीही मोठे तालुके, शहरे यातील पै, आणे जुळवण्याचे काम बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘सॉफ्टवेअर’मधील काही दोषांमुळेही संबंधित नावांची दुरुस्ती आणि बदल करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. लहान तालुके, शहर व गावे आहेत त्यांचे काम पूर्ण होईल. मात्र, मोठी शहरे आणि तालुक्‍यांचे काम योग्यरित्या पूर्ण होण्यासाठी अजूनही मुदतवाढ द्यावी लागेल असे दिसते. त्यामुळे एक ऑगस्टला सरसकट ऑनलाइन सातबारा तयार होणे अवघड आहे. 

‘महसूल’मधील बदल्या रखडल्या 
ऑनलाइन सातबाराचे काम पूर्ण करणे हे दिव्यच होऊन बसले आहे. त्यासाठी सरकारने ३१ जुलैची ‘डेडलाइन’ दिली असून एक ऑगस्टपासून ऑनलाइन सातबारा सुरू होईल, असे जाहीर केले आहे. त्यासाठी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या तलाठी, मंडलाधिकारी, नायब तहसीलदारांच्या बदल्याही करण्यात आलेल्या नाहीत. आदेश काढून त्या बदल्या थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

आज बदल, उद्या डिलीशन
ऑनलाइन सातबारातील नावांमध्ये अजूनही चुका राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. सातबाराच्या अर्जामध्ये बदल करून त्याची माहिती सॉफ्टवेअरला भरल्यानंतर ते सबमीट केले जाते. मात्र, उद्या परत तो सातबारा उघडल्यावर त्यामध्ये ती भरलेली माहिती दिसत नसल्याचेही प्रकार कऱ्हाडसह अन्य बऱ्याच ठिकाणी झाले आहेत. त्यामुळे पुन्हा-पुन्हा ती माहिती भरावी लागत आहे. त्यामध्ये बराच वेळ जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: karad news online 7/12 collection start

टॅग्स