प्लॅस्टिक बाटल्यांच्या पुनर्वापरातून धागा निर्मिती

नवी दिल्ली - प्राची महाडिक हिच्या संशोधनाचे कौतुक करताना तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
नवी दिल्ली - प्राची महाडिक हिच्या संशोधनाचे कौतुक करताना तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.

कऱ्हाड - मोठ्या शहरासंह ग्रामीण भागामध्ये सध्या प्लॅस्टिक कचऱ्याचा प्रश्‍न डोकेदुखीचा होऊन बसला आहे. याच प्लॅस्टिक कचऱ्यातील पाणी, शितपेयाच्या रिकाम्या बाटल्यांचा पुनर्वापर करून त्यावर संशोधन करण्याची किमया येथील लाहोटी कन्या प्रशालेतील विद्यार्थिनी प्राची संजय महाडिक हिने साध्य केली आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्या पुनर्वापरातून धागा निर्मिती करण्याच्या प्राचीच्या संशोधनाला तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली आहे. आता या संशोधनाचे पेटंट मिळवण्याच्या दृष्टीने प्राचीची वाटचाल सुरू आहे. 

उंडाळे (ता. कऱ्हाड) हे प्राचीचे मूळ गाव. सध्या महाडिक कुटुंबीय कऱ्हाड शहरात वास्तव्यास आहे. प्राची येथील लाहोटी कन्याशाळेत आठवीत शिकत आहे. गेल्या वर्षी सातवीत असताना प्राचीला कार्यानुभवच्या विषयासाठी प्लॅस्टिकपासून सुशोभित वस्तू आणण्यास सांगितले. त्या वेळी प्लॅस्टिकपासूनची फुले तयार करताना त्यास लागणारा दोराही प्लॅस्टिकचाच असावा, अशी तिला कल्पना सूचली. सुरवातीपासून विज्ञानाची आवड असल्याने प्राचीच्या प्लॅस्टिकच्या धाग्याच्या संशोधनाला चालना मिळाली. शिक्षिका संगीता शेवाळे यांना तिने ही कल्पना सांगितल्यावर या संशोधनास गती मिळाली. शेवाळे यांनी त्यासाठी प्राचीला सर्वोतोपरी मार्गदर्शन केले. पाणी, शीतपेयाच्या रिकाम्या बाटल्यांवर प्रक्रिया केल्यास त्याचा धागा तयार होऊ शकतो, हे स्पष्ट झाले. त्यासाठी प्लॅस्टिक बाटल्यांना ठराविक उष्णता दिल्यावर त्यातून धागा तयार होत असल्याचे संशोधन झाले. तिची प्रतिकृती तयार केली. त्यासाठी अनिल कावरे यांचे सहकार्य मोलाचे ठरले.

संशोधन यशस्वी झाल्यावर प्लॅस्टिकच्या बाटल्यापासून लांबी व आकाराने लहान, मोठे धागे तयार करून त्यापासून विविध प्रकारचे ब्रश, शोभेच्या वस्तू, बॅडमिंटन रॅकेट, झाडू आदी वस्तूही तयार केल्या. प्राचीचे या संशोधन प्रकल्पाने जिल्हास्तरीय ‘इन्स्पायर ॲवॉर्ड’मध्ये पहिला तर अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय इन्स्पायर ॲवॉर्ड स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला.

राष्ट्रीय पातळीवर दिल्ली येथेही या उपकरणाची निवड झाली. त्यात देशभरातून आलेल्या उपकरणांपैकी २० उपकरणांची राष्ट्रपतींना पाहण्यासाठी निवड झाली. त्यात महाराष्ट्रातून प्राचीच्या उपकरणाची निवड झाली. चार मार्च २०१६ रोजी राष्ट्रपती भवनात तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्राचीच्या उपकरणाची माहिती घेऊन तिने केलेल्या संशोधनाचे कौतुक केले. राष्ट्रपतींच्या कौतुकाची थाप पडल्याने प्राचीच्या बालसंशोधक वृत्तीला उभारी मिळाली आहे. विद्यमान राष्ट्रपती राम कोविंद यांना पाहण्यासाठीही राष्ट्रपती भवानात या महिनाखेरीस प्राचीला उपकरणासह निमंत्रण होते. मात्र, घरगुती कारणासह आठवीच्या परीक्षेमुळे दिल्लीला जाणे शक्‍य नसल्याचे सांगण्यात आले. प्राचीच्या या संशोधनाला पेटंट घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याची कागदोपत्री पूर्तता केली जात असल्याचे सांगून लवकरच पेटंटही मिळेल, असा विश्‍वास प्राचीसह तिच्या पालकांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com