प्लॅस्टिकबंदी झाली, "कास'मध्ये काय? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

सातारा - प्लॅस्टिकमुक्‍त काससाठी "सकाळ'ने मोहीम हाती घेतली अन्‌ पाच महिन्यांत हजारो नागरिकांनी काही हजार टन प्लॅस्टिक कचरा गोळा केला. हा कचरा नुकत्याच सुरू झालेल्या पावसामुळे तलावामध्ये वाहून जाण्यापासून वाचवता आलेला आहे. बहुतांश तलाव परिसर प्लॅस्टिकमुक्त झाला असला तरी त्याठिकाणी नव्याने कचरा पडणार नाही, याची जबाबदारी कोणीतरी घ्यावीच लागेल. सातारकरांच्या दैनंदिन पिण्याच्या पाण्याशी निगडित हा प्रश्‍न असल्यामुळे शासनाच्या प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कासमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवावी, अशी मागणी सजग सातारकरांची आहे. 

निम्म्या साताऱ्याला कासच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. उंचीवाढीनंतर संपूर्ण शहराला कासचे पाणी पुरून उरणार आहे. याठिकाणी पर्यटकांकडून पडणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाचे प्रश्‍न निर्माण झाले होते. शिवाय पावसाळ्यात हा कचरा तलावात वाहून जातो. या प्लॅस्टिकचे पाण्यावाटे सातारकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम संभवतात. हा धोका लक्षात घेऊन "सकाळ'ने कास स्वच्छता अभियान हाती घेतले होते. लोकसहभागातून 21 जानेवारी रोजी अभियानाचा नारळ वाढविण्यात आला. त्यानंतर प्रत्येक रविवारी, शनिवारी, मंगळवारी तसेच लोकांच्या सोईनुसार सुटीच्या दिवशी विविध व्यक्ती समूहांनी कासला जाऊन श्रमदान केले. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत हजारो सातारकरांनी काही टन प्लॅस्टिक कचरा गोळा केला. सातारा पालिकेच्या सहकार्याने तो कचरा डेपोत आणून जमा करण्यात आला. महिला दिन, कामगार दिन तसेच सातारा- कास रस्ता प्लॅस्टिकमुक्तीची विशेष मोहीम अशा औचित्यपूर्ण उपक्रमांतून केवळ सातारकरच नव्हे तर कऱ्हाडकर, वाईकरांनीही श्रमदान करून योगदान दिले. 

स्वच्छ काससाठी पर्यावरणप्रेमी सातारकर एकत्र आले. यापुढील काळातही सातारकरांमध्ये कास स्वच्छेच्या अनुषंगाने लोकजागृतीच्या उपक्रमांचे नियोजन आहे. कास तलाव परिसर प्लॅस्टिकमुक्त झाला. परंतु, हे चित्र कायमस्वरूपी तसेच ठेवण्याची जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल. नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाला ही जबाबदारी टाळता येणार नाही. प्लॅस्टिकबंदीने सर्वच प्रश्‍न सुटणार नाहीत. दारू व पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्या, खाद्यपदार्थांचे प्लॅस्टिक वेस्टन या गोष्टी पर्यटकांकडून कासमध्ये टाकल्या जातात. ते टाकले जाऊ नये, पर्यटकांनी याठिकाणी निसर्ग शिस्त पाळावी, तलाव प्रदूषित होऊ नये याकरिता काही नियमन करावे लागेल. त्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी लागेल. 

""कास पठाराला जागतिक वारसास्थळाचा दर्जा आहे. पठार आणि तलावात हवाई एक किलोमीटरचेही अंतर नाही. "कास'ची हद्द कास गावाची, नगरपालिकेची की पठारावर पर्यावरण कर घेणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीची, हा तांत्रिक मुद्दा आहे. कासचे पर्यावरण टिकावायचे असेल तर सलगता विचारात घ्यावीच लागेल. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला यात लक्ष घालून पर्यटकांमुळे प्रदूषणाचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, याची काळजी  घ्यावी लागेल. त्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणेची मोट बांधावी.'' 
-सुनील भोईटे,मानद वन्यजीवरक्षक

Web Title: karad news Plastics stopped kaas pathar