एप्रिलपासून अवैध रिक्षांची चेस तोडणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

नवीन रिक्षांना परमिट देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत रिक्षामालकांना कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर मात्र अवैध रिक्षांविरोधात कारवाईची धडक मोहीम हाती घेण्यात येईल.
- अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कऱ्हाड.

कऱ्हाड - प्रवाशांची जीव धोक्‍यात घालून सुरू असलेल्या अवैध रिक्षांना पायबंद घालण्यासाठी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ३१ मार्चची ‘डेडलाईन’ दिली आहे. ज्या रिक्षांचा नोंदणी कालावधी संपला आहे, अशांनी ३१ मार्चपूर्वी रिक्षांची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करून त्या नियमित करून घेणे आवश्‍यक आहे. अन्यथा एक एप्रिलपासून अशा रिक्षा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जप्त करून त्याच्या चेस तोडण्याची कार्यवाही केली जाणार आहे.  

अनेकदा रिक्षा चालकांकडून रिक्षांची तपासणी न करता प्रवाशी वाहतूक केली जाते. त्याचबरोबर ज्या मुदतबाह्य रिक्षा आहेत आणि ज्या विनापरवाना रिक्षा आहेत, त्यातूनही अनेकदा प्रवाशी वाहतूक केली जाते. प्रवाशांचा जीव धोक्‍यात घालून केल्या जाणाऱ्या या अवैध रिक्षांना चाप लावण्यासाठी ‘आरटीओ’ने एक पाऊल पुढे टाकले आहे. ज्या रिक्षांची मुदत संपली आहे. ज्या रिक्षांचे वेळेत तपासणी केलेली नाही. ज्या रिक्षा १५ वर्षांच्या पुढील आहेत यासह अन्य तपासण्यांसाठी ‘आरटीओ’ने संबंधितांना ३१ मार्चची मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र अशा अवैध आणि विनापरवाना रिक्षांवर कारवाईची धडक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. ज्या अवैध रिक्षा एप्रिलनंतर रस्त्यावर धावतील त्या जप्त करून त्यांची चेस तोडण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे आता अवैध रिक्षावाल्यांचे धाबे दणाणले आहेत. 

२० वर्षांनंतर परमिट 
गेल्या २० वर्षांपासून रिक्षांची परमीट दिलेली नव्हती. त्यामुळे अवैध रिक्षावाल्यांचे फावत होते. मात्र, ती देण्याची कार्यवाही पूर्ण होत आली आहे. रीतसर शासकीय शुल्क भरून संबंधितांना परमीट देण्यात येत आहेत. त्यामुळे आता यापुढे ज्या रिक्षा परमीटच्या आहेत, त्याच रिक्षा रस्त्यावर धावतील असे नियोजन ‘आरटीओ’ने केले आहे. त्यामुळे आपोआपच अवैध रिक्षांना चाप बसणार आहे.

Web Title: karad news satara news illegal rickshaw