एस टी संप: ताटकळलेल्या आबालवृदधांची खासगी वाहनांतून सोय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

दिवाळीच्या तोंडावरच आंदोलन सुरु झाल्याने एेन दिवाळीत प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. राज्यव्यापी संप असल्याने आणि बहुतांश प्रवाशांना याची फारशी माहिती नसल्याने त्यांनी नेहमीप्रमाणे आज प्रवासासाठी एसटीची वाट पाहिली. मात्र एसटी न आल्याने ग्रामीण भागातील अनेक आबालवृध्द प्रवाशांची मोठी गैरसोय झाली

कऱ्हाड - एसटी कर्मचाऱ्यांनी पुरकारलेल्या राज्यव्यापी संपामुळे सकाळच्या टप्यात प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मात्र ही गैरसोय होवु नये म्हणुन येथील आरटीओ कार्यालय आणि पोलिसांनी पर्यायी व्यवस्था म्हणुन खासगी वाहनांतुन प्रवाशांच्या प्रवासाची सोय केली. त्यामुळे एेन दिवाळीच्या तोंडावर एसटी बंद असल्याने होणारी गैरसोय टाळण्यात हातभार लागला.

एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी आजपासुन काम बंद आंदोलन पुकारले आहे. दिवाळीच्या तोंडावरच आंदोलन सुरु झाल्याने एेन दिवाळीत प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. राज्यव्यापी संप असल्याने आणि बहुतांश प्रवाशांना याची फारशी माहिती नसल्याने त्यांनी नेहमीप्रमाणे आज प्रवासासाठी एसटीची वाट पाहिली. मात्र एसटी न आल्याने ग्रामीण भागातील अनेक आबालवृध्द प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्याची तीव्रता वाढल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार येथील आरटीओ कार्यालय आणि शहर पोलिसांनी पर्यायी व्यवस्था म्हणुन खासगी जीप, टॅक्सी, विद्यार्थी वाहतुकीची वाहने यातुन प्रवाशांना त्यांच्या गावी मार्गस्थ करण्यासाठी मोहीम हाती घेतली.

त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या प्रवाशांची होणारी गैरसोय टळुन चांगली सोय झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. 

Web Title: karad news: st strike administration help