पहिले ऑलिंपिकवीर ६६ वर्षांनंतरही उपेक्षितच! 

पहिले ऑलिंपिकवीर ६६ वर्षांनंतरही उपेक्षितच! 

कऱ्हाड - ऑलिंपिकमध्ये भारताचा पहिल्यांदाच तिरंगा फडकवणारे आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात कुस्तीमध्ये जागतिक पातळीवरील पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या क्रीडा संकुलाच्या संघर्षाची कहानी आज तब्बल ६६ वर्षांनंतरही कायम आहे. त्यांच्या नावचे क्रीडा संकुल शासनाकडून बेदखलच झाल्याचे दिसते. आतापर्यंत देशाला ऑलिंपिकमध्ये अनेक पदके मिळाली. केंद्र सरकारने या ऑलिम्पिक विजेत्यांपैकी अनेकांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्ममविभूषण पुरस्कारांनी गौरवले. मात्र, देशाला पहिले पदक मिळवून देणारे त्यापासून वंचितच राहिल्याचे त्यांचे चिरंजीव रणजित जाधव यांनी सांगून त्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करून थकल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली आहे. 

घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असतानाही त्यावर मात करत खाशाबा जाधव यांनी गोळेश्वर (ता. कऱ्हाड) सारख्या ग्रामीण भागामध्ये त्याकाळी कसल्याही सोयीसुविधा नसताना अपार मेहनत करून शरीरयष्टी कमवत कुस्तीचा सराव केला. अनेक संकटांचे टप्पे पार करत त्यांनी परिस्थितीला शरण जाण्यास भाग पाडून देशातून वैयक्तिक क्रीडा प्रकारात देशाच्या ऑलिंपिक खेळाडूंच्या पथकात स्थान पटकावले. तिथपर्यंतचा त्यांचा प्रवास थरारक आहे. त्यांनी हेलसिंकी येथे झालेल्या कुस्ती या वैयक्तिक क्रीडा प्रकारात कास्यपदक जिंकून भारताचा तिरंगा तेथे डौलाने फडकवला. त्यानंतर कित्येक वर्षे देशाला वैयक्तिक वा सांघिक प्रकारात पदक पटकावता आलेले नव्हते. त्यांच्या पश्‍चात त्यांची स्मृती चिरंतन राहून ग्रामीण भागातूनही ऑलिंपिक स्पर्धेत टिकतील असे मल्ल तयार व्हावेत यासाठी खाशाबा जाधव यांच्या मूळगावी गोळेश्वर येथे त्यांच्या नावे सुसज्ज कुस्ती संकुल उभरण्यात यावे, असा प्रस्ताव त्यांचे चिरंजीव रणजित जाधव यांनी शासनाला दिला होता. त्यानुसार २००९ मध्ये कुस्ती संकुलासाठी एक कोटी मंजूर करण्यात आले. मात्र, हा निधी इच्छाशक्तीच्या अभावामुळे प्रत्यक्षात वर्गच झाला नसल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. त्यामुळे कुस्ती संकुलासाठी करण्यात आलेली घोषणा ही अजून कागदावरच राहिली आहे. त्याचबरोबर खाशाबा जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाने त्यांना पद्ममविभूषण पुरस्काराने गौरवावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांकडे रणजित जाधव यांनी केली होती. मात्र, खेळांबद्दलची उदासिनता, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, प्रशासनातील ढिलाईपणा या गोष्टींमुळेच त्यांना हा पुरस्कार देण्यात येत नसल्याचा आरोप श्री. जाधव यांनी केला आहे. त्यामुळे शासनदरबारी क्रीडा संकुल आणि पुरस्काराच्या रूपाने खाशाबा जाधव उपेक्षितच राहिले आहेत.


देशातील पहिल्या ऑलिंपिकपदक विजेत्या (कै.) खाशाबा जाधव यांची शासनाकडून एवढी अवहेलना होईल असे वाटत नव्हते. त्यासाठी मध्यंतरी मी ऑलिंपिकचे पदकच लिलावात काढण्याची मागणी केली. त्यानंतरही शासनाकडून क्रीडासंकुल, पद्ममविभूषण पुरस्कारापासून खाशाबा जाधव उपेक्षितच राहिले आहेत.
-रणजित जाधव, खाशाबा जाधव यांचे सुपुत्र 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com