अवैध दारू व्यवसायातील कोकण कनेक्‍शन

सचिन शिंदे
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

विभागांच्या समन्वयाची नुसती चर्चाच... 
बनावट दारूचा कारखाना, हातभट्टीची येणारी अवैध दारू त्याशिवाय विनापरवाना वाहतूक होणारी दारू असे कऱ्हाडसह पाटण तालुक्‍यात मोठे प्रस्थ वाढत आहे. त्यामागे मोठे ‘ब्रेन’ काम करत आहे. त्या सगळ्यांच्या पर्दाफाश करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कला मोठी कारवाई करावी लागेल. ती कारवाई करताना त्यांना पोलिसांची मदत अपेक्षित आहे. पोलिस व ‘उत्पादन शुल्क’ने एकत्रित समन्वयाने काम केल्यास ते शक्‍य होईल. मात्र दोन्ही विभागांत कारवाई करण्यासाठी समन्वय असावा, अशी नुसतीच चर्चा होत आहे. त्यावर शासन काहीच ठोस निर्णय घेताना दिसत नाही.

कऱ्हाड - कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांच्या ग्रामीणसह निमशहरी भागात अवैध दारूचा काळाबाजार सुरू आहे. पाटण येथे कोकणातून आलेली हातभट्टीची दारू जप्त झाली. दीव, दमण, गोव्यासह हातभट्टी व बनावट अवैध दारू व्यवसायातील कोकण कनेक्‍शनही अधिक ठळकपणे पुढे आले आहे. त्यामुळे त्यावर योग्य कारवाईसाठी आराखडा तयार करावा लागेल.

कोकणातून आलेली हातभट्टीची अवैध दारू पाटण तालुक्‍यात पकडली. त्यापूर्वी करवडी व विरवडे येथे बनावट दारू तयार करणारा कारखाना उद्‌ध्वस्त केला गेला. तेथे येणारी दारू दीव, दमणहून आल्याचा अंदाज आहे. कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू व्यवसाय चालतो. अनेक मोठ्या कारवाई होऊनही त्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. पाच वर्षांत किमान चार ते पाच वेळा बनावट दारू तयार करणारे कारखाने उत्पादन शुल्क किंवा पोलिसांनी उद्‌ध्वस्त केले. पाटणलाही मध्यंतरी हातभट्टी उद्‌ध्वस्त करण्यात आली. तासवडे, विरवडे, वाठार, चांदोलीचा रस्ता अशा वेगवेगळ्या ठिकाणी बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई झाली. मात्र, त्याचा पुढे काहीच तपास झाला नाही. 

तासवडे येथे तर किमान ३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

त्याचाही तपास पुढे सरकू शकला नाही. तेथे दीव, दमण भागातील बनावट दारू आणली जात होती. ती ब्रॅण्डेड दारूच्या बाटलीत मिसळून ती वितरित केली जात होती. त्याचाही तपास झाला नाही. मल्हारपेठ येथे मध्यंतरी दारू जप्त झाली. त्यात काही दारू बनावट होती. त्याचा तपासही पुढे सरकला नाही. दीव, दमण, गोव्याशिवायही सांगली जिल्ह्यातून हातभट्टीची येणारी दारू शिवनगरसह उंडाळे, शेडगेवाडी भागात जप्त झाली होती. त्याचाही तपास सांगली जिल्ह्यापर्यंत गेला. 

किमान तीन ते चार वर्षांपासून कारवाया होत आहेत. तपासाच्या नावाखाली तडजोडीही होताना दिसतात. एकाही गुन्ह्याचा तपास शेवटपर्यंत गेल्याचे दिसत नाही. त्यामुळे बनावट दारूसह अवैध दारू व्यवसायाचा काळाबाजार अधिक गंभीर होताना दिसतो. मागील तपासात काहीच सुधारणा नसताना पुन्हा दोन मोठ्या कारवाया होत आहेत. त्यातून बनावट दारूचा काळाबाजार अधिक स्पष्ट झाला आहे. विरवडे येथे भरारी पथकाने बनावट दारूचा कारखाना उद्‌ध्वस्त केला. तो कोणाच्या वरदहस्ताने चालत होता, त्यामागे नक्की कारणे काय आहेत, त्यामागचा ब्रेन कोण आहे, याचाही तपास करण्याचे आव्हान ‘उत्पादन शुल्क’समोर आहे.

Web Title: karad news western maharashtra news illegal wine business connection