मुख्याधिकारी बदलीच्या वादात विकासाला खीळ

मुख्याधिकारी बदलीच्या वादात विकासाला खीळ

कऱ्हाड पालिकेमध्ये पदाधिकारी-कर्मचाऱ्यांचाही सहभाग; वातावरण गढूळ 
कऱ्हाड - मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या कार्यपद्धतीविरोधात पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महिनाभरापासून पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा वातावरणामुळे शहराच्या विकासावर परिणाम झाला आहे. 

मुख्याधिकारी औंधकर यांच्या कार्यपद्धतीविरोधात तीन कर्मचाऱ्यांनी उपोषण केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वच कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून आंदोलन केले. त्याचवेळी पदाधिकाऱ्यांनीही श्री. औंधकर यांच्यावर आर्थिक आरोप करत त्यांच्या बदलीची तसेच त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचा ठरावही केला आहे.

मुख्याधिकाऱ्यांची आठ दिवसांत बदली करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासन दिल्याचे नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी सांगितल्यावर १८ जून रोजी उपोषण व आंदोलन मागे घेतले. महिना होत आला तरी अद्याप मुख्यमंत्र्यांची आश्‍वासनपूर्ती झालेली नाही. दरम्यानच्या काळात सक्तीच्या रजेवरून परतल्यावर मुख्याधिकारी औंधकर २८ जून रोजी पालिकेत हजर होण्यासाठी गेले असता कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद ठेवून ठिय्या आंदोलन केले.

सुमारे तीन तासांनंतर श्री. औंधकर पालिकेतून बाहेर पडल्यावर कर्मचाऱ्यांनी पुन्हा काम सुरू केले. त्यामुळे गेला महिनाभरापासून पालिकेला मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीची प्रतीक्षा आहे. नोव्हेंबरला निवडणुकीपूर्वी अंतिम टप्प्यात आलेल्या कोल्हापूर नाक्‍यावरील स्वागत कमान, जलतरण तलावासह अनेक कामांना गती देण्यात पालिका अपयशी ठरली आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. निवडणुकीनंतर झालेला सत्ता बदल, अनेक नव्या दमाचे नगरसेवक असल्याने कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा असताना ती फोल ठरली आहे. केंद्रात व राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला कऱ्हाडच्या जनतेनेही थेट निवडणुकीद्वारे नगराध्यक्षपद भाजपच्या पारड्यात टाकल्याने विकासाच्या वेगाबाबतीत शहराला अपेक्षा होत्या. मात्र, त्या पूर्ण करण्यात भाजपला यश आले नसल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतरही श्री. औंधकर यांची अद्याप बदली झाली नसल्याने ते कायम राहतील, अशी चर्चा आहे. त्यांच्या समर्थनार्थ काही नागरिकांकडून निवेदन देण्यात येत आहे. त्यामुळे श्री. औंधकर कायम राहिल्यास पदाधिकारी, कर्मचाऱ्यांची भूमिका काय असणार, याकडे लक्ष लागून आहे. सहाजिकच या वादाचा शहराच्या विकासावर होणारा परिणाम चिंताजनक आहे.

रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान
‘ब’ वर्ग पालिकेमध्ये सर्वाधिक कर्मचारी संख्या व पायाभूत सुविधेसाठी सक्षम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कऱ्हाड पालिकेला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी आणि अपूर्ण कामांना गती देऊन ती पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. केवळ प्रयत्न न होता विकासकामांचा वेग वाढवण्याचेही आव्हान राहणार आहे. घनकचरा, वाहतूक, आरोग्य, पाणीपुरवठा आदी अडचणींवर मात करताना २४ तास पाणी योजना, शहरासह वाढीव भागातील सुधारित भुयारी गटार योजना आदी रखडलेल्या प्रकल्पांचे काम पूर्ण करण्याचेही आव्हान आहे. तरच शहरात विकासाला खऱ्या अर्थाने गती येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com