ना शस्त्र... ना सापळे... ना भूल देणारी यंत्रणा!

सचिन शिंदे
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

कऱ्हाड - नागरी वस्तीत शिरणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडे अद्ययावत यंत्रणा नाही, शस्त्रे नाहीत. गुंगीचे इंजेक्‍शन देण्याची व्यवस्था नाही. पुरेसे सापळे नाहीत की पकडण्यासाठीचे योग्य नियोजनही दिसत नाही. वन विभागाकडे बिबट्यांच्या संख्येची मोजदादही नाही. अशा अत्यंत कठीण स्थितीत वन विभागाचा ‘कारभार’ सुरू असल्याचे दिसते.

व्याघ्र प्रकल्प परिसरासह कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांत दिवसेंदिवस वाढणाऱ्या मनुष्य व श्वापदांच्या संघर्षात वन विभागाचेच अपयश अगदी स्पष्ट दिसते. त्यात सुधारणा करण्यासाठी कोणत्याही पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाही. 

कऱ्हाड - नागरी वस्तीत शिरणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडे अद्ययावत यंत्रणा नाही, शस्त्रे नाहीत. गुंगीचे इंजेक्‍शन देण्याची व्यवस्था नाही. पुरेसे सापळे नाहीत की पकडण्यासाठीचे योग्य नियोजनही दिसत नाही. वन विभागाकडे बिबट्यांच्या संख्येची मोजदादही नाही. अशा अत्यंत कठीण स्थितीत वन विभागाचा ‘कारभार’ सुरू असल्याचे दिसते.

व्याघ्र प्रकल्प परिसरासह कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांत दिवसेंदिवस वाढणाऱ्या मनुष्य व श्वापदांच्या संघर्षात वन विभागाचेच अपयश अगदी स्पष्ट दिसते. त्यात सुधारणा करण्यासाठी कोणत्याही पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाही. 

उंडाळ्यालगतच्या चोरमारवाडीत सुमारे १५ तास बिबट्या एका घरात ग्रामस्थांनी कोंडून ठेवला. तो बिबट्या वन विभागाला जेरबंद करून पकडता आला नाही. बिबट्याला पकडण्यासाठी असलेल्या रेस्क्‍यू ऑपरेशनमध्येही वन विभाग नापास ठरल्याचे दिसते. नागरी वस्तीतून बिबट्या पसार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी खात्याच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

स्थितीही तशीच होती. वन विभाग तत्परता दाखवत रात्रीच चोरमारवाडीत आले खरे; पण त्यांना बिबट्याला पकडण्यात यश आले नाही. त्याची कारणेही महत्त्वाची आहेत. उजाडल्यानंतर सकाळी वन विभागाच्या यंत्रणेने शोध मोहीम सुरू केली. त्यांच्याकडे यंत्रणा अपुरी होती. त्यामुळे शोध मोहिमेत अडथळा आला. बिबट्याला पकडण्यासाठी अद्ययावत यंत्रणा नव्हती. आणलेली वाघरही कुचकामी ठरली. बिबट्या पसार झाल्यानंतर हे सिद्धच झाले. बिबट्याला घरातून बाहेर काढण्याचेही प्रयत्न झाले. मात्र, त्यावेळीही अपुरे मनुष्यबळ आणि अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांमुळे काही करता आले नाही. दोन स्थानिक नागरिक घरावर चढले. त्यांनीच वाघराचे जाळे पसरले. पण, कौलातून अचानक बिबट्या बाहेर आला तर काय करायचे, याचा विचार वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी केला नव्हता. बिबट्या बाहेर आला तर त्याला बेशुद्ध करण्याची अद्ययावत यंत्रणा नव्हती. झालेही तसेच. गुरगुरतच बिबट्या बाहेर आला अन्‌ दोन पावलांतच डोंगराकडे धूम ठोकली. वन विभागाला अपयश आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अद्ययावत यंत्रणेचा अभाव, अपुरे मनुष्यबळ, प्रशिक्षणाचा अभाव अशा अनेक मुद्द्यांमुळे वन विभाग निषेधाचा धनी ठरला.

कऱ्हाडसह पाटण भागात अनेक गावांत बिबट्याचा संचार स्वच्छंद, स्वैर व नागरी वस्तीवर हल्ला करणारा होत आहे. त्याकडे वन्यजीवसह वन विभाग फारसे गांभीर्याने पाहत नाही. कऱ्हाडसह पाटण तालुक्‍यात उसाचे क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे त्याचा आडोसा घेत बिबट्या खाद्याच्या शोधार्थ मानवी वस्तीपर्यंत येवून धडकत आहे. डोंगरदऱ्यांत बिबट्याची असलेली वस्तीस्थाने नाहिशी होत असल्याचा परिणाम म्हणून याकडे पाहिले जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बिबट्याची संख्या वाढली आहे. त्याची नेमकी नोंद वन खात्याकडे नाही. वन खात्याने २०१४ मध्ये बिबट्याची मोजणी केली.

त्यावेळी ३३ बिबट्यांची नोंद आहे. त्यानंतर अलीकडे मोजदाद झालेली नाही. बिबट्यांच्या संख्येबाबत खुद्द वन विभागच अनभिज्ञ आहे. बिबट्या ग्रामस्थांना दिसतो. त्याने आठवड्यात एक तरी जनावर मारल्याची नोंद वन विभागाकडे होते. मात्र, वन खात्याला बिबट्या दिसत नाही, ही स्थिती कुठे तरी बदलली पाहिजे.

अठरापेक्षा जास्त बिबट्यांचा मृत्यू
कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांत बिबट्या विरुद्ध मनुष्य असा संघर्ष होताना दिसत आहे. आगाशिव डोंगर, पाठरवाडी, विंगचा डोंगर, तळबीड व वसंतगड येथील डोंगरावरही बिबट्या सहज दिसत आहे. पाच वर्षांच्या काळात नैसर्गिकपेक्षाही अपघातात व मनुष्याच्या संघर्षात अठरापेक्षा जास्त बिबट्यांना प्राणास मुकावे लागले. तरीही शासनाने ठोस पावले उचललेली नाहीत. त्यामुळे आता नागरी वस्तीत वाढलेल्या बिबट्यांची संख्या व त्याच्याकडून होणारा संहार थांबवण्याचे आव्हान वन विभाग पेलणार कसे, हाच खरा प्रश्न आहे. 

Web Title: karad satara news leopard