ऑनलाइन सातबारा दुरुस्ती सुरूच

हेमंत पवार
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

अपूर्ण कामामुळे उताऱ्यासाठी अजूनही १५ दिवस लागणार

कऱ्हाड - महसूल दिनाच्या औचित्याने ऑनलाइन सातबारा एक ऑगस्टपासून सुरू होईल, असे शासनाने जाहीर केले होते. मात्र, काही तांत्रिक चुका, सातबाराच्या नोंदीतील चुका दुरुस्त करण्याचे काम आजही सुरूच होते. अजूनही जिल्ह्यातील अनेक मोठी शहरे आणि मोठ्या गावांतील दुरुस्त्या बाकी असून, आणेवारी जुळवण्याचेही काम काही प्रमाणात प्रलंबित आहे. त्यामुळे ऑनलाइन उताऱ्यासाठी अजूनही १५ दिवसांहून अधिक काळ वाट पाहावी लागेल, असे दिसते. 

सातबारातील गैरप्रकार रोखण्यासाठी शासनाने ऑनलाइन सातबाराचे धोरण घेतले. सुमारे सहा वर्षांपूर्वी आघाडी सरकारच्या काळात पहिल्यांदा त्याची कार्यवाही सुरू झाली. त्या वेळी कऱ्हाडसह अन्य ठिकाणी त्या दाखल्यांचे वाटपही करण्यात आले. मात्र, त्यामध्ये काही तांत्रिक चुका राहात असल्याने आणि सहीचा प्रश्‍न असल्याने पुन्हा सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार त्याची कार्यवाही सुरू केल्यानंतरही काही समस्या

निर्माण झाल्या. त्यासाठी सरकारने कालबद्ध कार्यक्रम तयार करून एक ऑगस्टपासून ऑनलाइन सातबारा सुरू करण्यात येईल, असे जाहीर केले. त्यासाठी गेली पाच महिने तलाठी, मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदारांमार्फत दिवस- रात्र कामकाज सुरू आहे, तरीही मोठे तालुके, मोठी शहरांत पै, आणे जुळवण्याचे काम राहिले आहे. त्याचबरोबर नावांची दुरुस्ती आणि बदल करण्याचेही काम बाकी आहे. त्यातच काही वेळेला सॉफ्टवेअरही साथ देत असल्याने कर्मचारी वैतागले आहेत. सरकारने एक ऑगस्ट ऑनलाइन सातबारा सुरू करण्यात येईल, असे जाहीर केले. मात्र, आजही सातबारातील तांत्रिक चुका, सातबाराच्या नोंदीतील चुका, नावांची दुरुस्ती करण्याचे काम सुरूच आहे. ते काम अजूनही १५ दिवसांहून अधिक काळ सुरू राहील, असे सांगण्यात येत आहे. 

नावातील गोंधळ मिटेना 
ऑनलाइन सातबारासाठी तयार करण्यात आलेल्या सर्व खातेदारांची माहिती सॉफ्टवेअरला भरण्यात आली आहे. मात्र, त्यामध्ये स्पेलिंग चुकल्याने अनेक गावांतील नावांमध्ये फरक दिसून येत आहे. त्यामुळे ऑनलाइन सातबारातील नावामध्ये अजूनही चुका आहेत. त्याची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले असले, तरी काही तांत्रिक कारणाने त्यामध्ये दुरुस्त्या कराव्याच लागत असल्याचे सांगण्यात आले. 

जमीन व्यवहारावरही परिणाम 
ऑनलाइन सातबाराचे काम जिल्ह्यात बऱ्यापैकी पूर्ण झाले आहेत. मात्र, अजूनही काही मोठी गावे व शहरांतील दुरुस्तीची कामे बाकी आहेत. सध्या जमिनीच्या खरेदी- विक्रीसाठी ऑनलाइन सातबारा असणे आवश्‍यक करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी जेथे काम बाकी आहे. तेथील व्यवहार ठप्प झाले आहेत.

Web Title: karad satara news online 7/12 repairing