सह्याद्री कारखान्यावर रंगल्या ‘ऑलिंपिक’ कुस्त्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

कऱ्हाड - सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर नुकत्याच झालेल्या ऑलिंपिक पद्धतीच्या कुस्ती स्पर्धेत २११ मल्लांनी सहभाग घेतला.

कऱ्हाड - सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर नुकत्याच झालेल्या ऑलिंपिक पद्धतीच्या कुस्ती स्पर्धेत २११ मल्लांनी सहभाग घेतला.
कारखान्याचे संस्थापक (कै.) पी. डी. पाटील यांनी ग्रामीण भागातील युवकांमध्ये कुस्ती या मर्दानी खेळाची आवड निर्माण व्हावी व त्यातून राज्य व देशपातळीवरील खेळाडू तयार व्हावेत, यासाठी वजन गटानुसार मानधनावरील ऑलिंपिक पद्धतीच्या कुस्ती स्पर्धा कारखाना कार्यस्थळावर भरवण्यास सुरवात केली. ती परंपरा कारखान्याचे अध्यक्ष आमदार पाटील यांनी सुरू ठेवली. या स्पर्धा नुकत्याच झाल्या. या स्पर्धेत अंतिम सामन्यातील विजेत्या खेळाडूस वजन गटानुसार प्रतिमहिना एक वर्षासाठी मानधन व उपविजेत्या खेळाडूस प्रोत्साहनपर बक्षीस कारखान्यातर्फे 
देण्यात आले. 

स्पर्धेतील विजेते असे : ३५ किलो वजन गटातून सुजल कांबळे (सुपने), ३८ किलोत प्रथमेश पाटील (सुपने), ४२ किलोत श्रेयश कदम (पारगाव), ४६ किलोमध्ये विनय चन्ने (सोहोली), ५० किलोत अक्षय पाटोळे (कडेगाव), ५५ किलोत प्रशांत शिंदे (अंतवडी), ५७ किलोमध्ये विजय नलवडे (किवळ), ६१ किलोत महादेव खरात (रहिमतपूर), ६५ किलोत पवन शिंदे (अंतवडी), ७० किलोत गौरव हजारे (कोपर्डे हवेली), ७४ किलोत अनिकेत चव्हाण (कोंबडवाडी), ७४ किलोवरील खुल्या गटात रोहन भोसले (वेळू) आदी स्पर्धक 
विजयी झाले.

कारखान्याचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व संचालकांच्या उपस्थितीत विजेत्यांना सह्याद्री स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रा. एस. ए. डांगे यांनी समालोचन केले. प्रा. दिलीपराव पवार, प्रा. डी. डी. ननावरे, नजरुद्दीन नायकवडी, संभाजी पाटील, बबन चौगुले, प्रा. दिनकर सावंत, बापूसाहेब माने यांनी पंच म्हणून काम पाहिले. या वेळी आमदार पाटील, संचालक पैलवान संजय थोरात, संजय जगदाळे, संजय कुंभार, भास्करराव गोरे, माजी संचालक लालासाहेब पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, हिंदकेसरी संतोष वेताळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. सी. बडगुजर, दिगंबर डांगे आदी उपस्थित होते.

Web Title: karad satara news sahyadri sugar factory olympic wrestling competition