विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘इलेक्‍शन फीवर’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

‘यिन’अंतर्गत कऱ्हाडसह फलटण, वाई, पुसेगाव, शिरवळ, रहिमतपूरला मतदान  

कऱ्हाड - यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत जिल्ह्यात कऱ्हाडसह विविध ठिकाणच्या महाविद्यालयांत आज चुरशीने व मोठ्या उत्साहाने तरुणाईने मतदान केले. मतदानासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लागलेल्या रांगांमुळे महाविद्यालय परिसरात अनेकांनी आज ‘इलेक्‍शन फिवर’ अनुभवले. 

‘यिन’अंतर्गत कऱ्हाडसह फलटण, वाई, पुसेगाव, शिरवळ, रहिमतपूरला मतदान  

कऱ्हाड - यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत जिल्ह्यात कऱ्हाडसह विविध ठिकाणच्या महाविद्यालयांत आज चुरशीने व मोठ्या उत्साहाने तरुणाईने मतदान केले. मतदानासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लागलेल्या रांगांमुळे महाविद्यालय परिसरात अनेकांनी आज ‘इलेक्‍शन फिवर’ अनुभवले. 

‘यिन’च्या नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत येथील चार महाविद्यालयांत निवडणूक प्रक्रिया पार पडली. येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, प्रा. डॉ. रमेश पोळ, जिमखाना विभागाच्या प्रा. विद्या पोळ, प्रा. एस. ए. पाटील आदींच्या उपस्थितीत मतदान प्रक्रियेस सुरवात झाली. मतदान केंद्राच्या बाहेर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रांगा लावल्या होत्या. यावेळी मतदानासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींचा उत्साह दिसून येत होता. लांबलचक लागलेल्या रांगांमुळे दोन मतदान केंद्रे तयार करून मतदान प्रक्रियेस गती देण्यात आली.

मतदानासाठी नावनोंदणी करून त्यांच्या बोटाला शाई लावण्याच्या प्रक्रियेमुळे विधानसभा, लोकसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा अनुभव येत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. यावेळी उमेदवार मतदान केंद्राबाहेर थांबून होते. वेणूताई चव्हाण महाविद्यालयातही मोठ्या उत्साहात मतदान झाले. प्राचार्य डॉ. पुरंदर चौगुले, प्रा. व्ही. पी. धुमाळ, ‘यिन’चे मुख्यमंत्री अनिकेत मोरे यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया सुरू झाली. या वेळी उमेदवारांनी निवडणुकीला उभे राहण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मतदानासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या.

विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मोठ्या चुरशीने मतदान केले. यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात प्रा. महाडिक, प्रा. रेळेकर, प्रा. डाके, ‘यिन’चे मुख्यमंत्री मोरे आदींच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया झाली. या वेळी उमेदवारांनी स्वत:ची ओळख करून देत भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मतदानास सुरवात झाली. मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयातही प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील, प्रा. काकडे, प्रा. घाटगे, प्रा. चौगुले, प्रा. म्हेत्रे, प्रा. मोहिते आदींच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले. 
 
फलटणमध्येही प्रतिसाद
फलटण शहर - महाविद्यालयीन जीवनात प्रथमच पाऊल टाकणाऱ्या येथील विद्यार्थांनी ‘यिन’ प्रतिनिधी निवडीत हिरीरिने भाग घेवून युवकांचे नेतृत्व करण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले. मुधोजी व नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. ‘मुधोजी’त सूरज लोंढे, आरबाज मुजावर, प्रतीक जाधव, मुकुंद देवकर, चैत्राली भोसले, वेदिका निंबाळकर, मधुरा बोथेकर, माही कर्वे, तर बेडके महाविद्यालयात अनिकेत नेरकर, सना आतार, विठ्ठल चव्हाण, सुप्रिया मोहिते हे निवडणूक रिंगणात उभे राहिले. निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रा. एस. एस. दळवी, प्रा. बी. एस. कांबळे, प्रा. एस. डी. इंगळे, प्रा. डी. आर. राऊत,  प्रा. ए. आर. गायकवाड, प्रा. ए. एस. तांबोळी, प्रा. एस. एम. दणाणे, प्रा. टी. आर. धुमाळ, ए. एल. शिंदे व ‘सकाळ’चे वितरण प्रतिनिधी अजिंक्‍य करपे यांनी कामकाज पाहिले.

वाईतही उत्साहात मतदान
वाई - येथील किसन वीर महाविद्यालयात ‘यिन’ प्रतिनिधींसाठीची निवडणूक उत्साहात व शांततेत पार पडली. या निवडणुकीसाठी सागर फणसे, केदार काळे, सोनाली सणस आणि रसिका देशमाने या विद्यार्थ्यांनी उमेदवारी स्वीकारली होती. लोकशाही पद्धतीने मतदान घेण्यात आले. त्यास महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मुलींचा सहभाग मोठा होता. प्राचार्य डॉ. सी. जी. येवले व उपप्राचार्य डॉ. एस. आर. बोटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. आनंद घोरपडे आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी निवडणूक शांततेत पार पाडण्याकामी सहकार्य केले.

पुसेगावात मतदानास रांग
पुसेगाव - येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘यिन’ प्रतिनिधीसाठी उत्साहात मतदान झाले. त्यात विद्यार्थिनींनी सकाळपासून मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. प्राचार्य डॉ. संजय कांबळे आणि त्यांच्या सहकारी प्राध्यापकांनी निवडणूक पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

गवळी कॉलेजातही उत्साह 
सातारा - पानमळेवाडी (लिंब खिंड) येथे अरविंद गवळी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये उत्साहात मतदान झाले. त्यात प्राचार्य अतुल आयरे, प्रा. महेश शिंदे, प्रा. नाझिया मुलाणी आदी सहकारी प्राध्यापकांनी निवडणूक पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

शिरवळमध्येही गर्दी
शिरवळ - श्रीपतराव कदम महाविद्यालयात ‘यिन’ प्रतिनिधीसाठी मतदान झाले. त्यात विद्यार्थी- विद्यार्थिनींनी उत्साहात सहभाग घेतला. प्राचार्य एन. जी. गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदान प्रक्रियेसाठी सहकार्य केले.

माने कॉलेजात मतदान 
रहिमतपूर - सरदार बाबासाहेब माने महाविद्यालयातही ‘यिन’ प्रतिनिधीपदासाठी मतदान झाले. त्यात विद्यार्थी- विद्यार्थिनींनी उत्साहात सहभाग घेतला. प्राचार्य डॉ. भाग्यश्री जाधव, प्रा. प्रदीप सावंत. प्रा. प्रकाश जगताप, प्रा. आबासाहेब वैराट आदींनी मदत केली.

Web Title: karad satara news yin election