नेत्यांकडून बेरजेच्या राजकारणाला गती 

Akhada-ZP
Akhada-ZP

कऱ्हाड - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच नेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. त्यामुळे सत्तेच्या सारीपाटासाठी तालुक्‍यात सध्या आरपारची लढाई सुरू आहे. नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. धोका पत्करून प्रतिष्ठा कमी होण्याअगोदरचे उपाय म्हणून काही नेत्यांकडून सावध पवित्रा घेवून बेरजेच्या राजकारणासाठी हालचाली सुरू आहेत. 

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी सध्या तालुक्‍यात जोरदार घमासान सुरू आहे. या निवडणुकीत तालुक्‍यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. या निवडणुकीत गेली अनेक वर्षे एकत्र असणारे गट विभक्त होवून नवी राजकीय समीकरणे जुळून आली आहेत. आघाड्यात बिघाडीही झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत तालुक्‍यातील सर्वच नेत्यांनी सवतासुभा करून दंड थोपटलेले दिसतात. परिणामी तालुक्‍यातील सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

कृष्णा कारखाना व बाजार समितीच्या पार्श्‍वभूमीवर एकत्रित आलेल्या उंडाळकर-भोसले गटाने या निवडणुकीत एकमेकांपासून फारकत घेत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन्ही गटांची ताकद विभागली जाणार आहे. त्याचबरोबर या निवडणुकीसाठी मोहिते-भोसले गटाचे मनोमीलन झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही गटांची ताकद एक झाल्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटावर परिणाम होऊ शकतो. चव्हाण गटापासून मोहिते गट अजून तरी दूरच असल्याचे दिसते. 

कऱ्हाड दक्षिणमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादी कॉंग्रेसने वातावरणनिर्मिती करून लोकांच्या पसंतीचे उमेदवार देण्यासाठी सातत्याने बैठका-भेटीगाठीचा जोर लावला आहे. भाजपनेही राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, प्रदेश चिटणीस अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या माध्यमातून तालुक्‍यात सर्व ठिकाणी उमेदवार मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेनेही सक्षम उमेदवारांना उमेदवारी देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे यावेळी मोठ्या प्रमाणात मतांची विभागणी होऊ शकते. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींची उंचीही मोठी आहे. त्यामुळे त्याला साजेशी कामगिरी व्हावी, यासाठी सर्व नेत्यांनी सर्व ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे सर्व गट व गणांत तिरंगी-चौरंगी लढत होईल. 

वर्चस्वासाठी नेत्यांकडून तडजोड? 
सत्तेच्या सारीपाटासाठी चाललेल्या लढाईत आपलेच वर्चस्व राहावे, यासाठी सर्वच नेत्यांनी कंबर कसली आहे. मात्र, या आरपारच्या लढाईत काय होईल, ते सांगता येत नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच काही तरी तडजोड करून उमेदवार निवडून आणण्यासाठी काही नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणुकीत धोका पत्करून प्रतिष्ठा कमी होण्याअगोदरच त्यांनी उचलेल्या पावलांना कितपत यश येतंय, हे लवकरच समजेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com