कऱ्हाडला अखेरच्या दिवशी राजकीय उलथापालथ 

हेमंत पवार - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

कऱ्हाड - जिल्हा परिषद- पंचायत समितीसाठी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी तालुक्‍यात काही गट व गणांतील राजकीय समीकरणे बदलली. कालेतील भीमरावदादा पाटील यांनी उंडाळकर गटाला साथ दिली, तर उंडाळकरांच्या मार्गदर्शनाखालील कऱ्हाड तालुका विकास आघाडीने मोहिते- भोसलेंच्या रेठऱ्यामध्ये जिल्हा परिषदेला उमेदवारी दिली नाही, येळगाव गटातून ॲड. उदयसिंह पाटील व ॲड. आनंदराव पाटील यांची लढत निश्‍चित झाली, तर ज्यांनी उमेदवारी मिळणारच म्हणून तयारी केली होती, त्यातील अनेकांचा ‘एबी’ फॉर्म न मिळाल्याने पत्ता कट झाल्याने ते बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत.

कऱ्हाड - जिल्हा परिषद- पंचायत समितीसाठी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी तालुक्‍यात काही गट व गणांतील राजकीय समीकरणे बदलली. कालेतील भीमरावदादा पाटील यांनी उंडाळकर गटाला साथ दिली, तर उंडाळकरांच्या मार्गदर्शनाखालील कऱ्हाड तालुका विकास आघाडीने मोहिते- भोसलेंच्या रेठऱ्यामध्ये जिल्हा परिषदेला उमेदवारी दिली नाही, येळगाव गटातून ॲड. उदयसिंह पाटील व ॲड. आनंदराव पाटील यांची लढत निश्‍चित झाली, तर ज्यांनी उमेदवारी मिळणारच म्हणून तयारी केली होती, त्यातील अनेकांचा ‘एबी’ फॉर्म न मिळाल्याने पत्ता कट झाल्याने ते बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

राजकीय संवेदनशील आणि व्याप्तीने मोठ्या असलेल्या कऱ्हाड तालुक्‍यात जिल्हा परिषद- पंचायत समितीसाठी जिल्ह्यात सर्वाधिक ४३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तालुक्‍यातील काही गट व गणांतील राजकीय समीकरणे बदलली.  विधानसभेपासून भोसले गटाबरोबर असलेले आणि कऱ्हाड दक्षिणमधील ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील यांनी भोसले गटाची साथ सोडून उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील कऱ्हाड तालुका विकास आघाडीला साथ दिली. त्यांच्या आघाडीतून दादांची सून व त्यांचे सुपुत्र आणि पंचायत समिती सदस्य दयानंद पाटील यांच्या पत्नीचा पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे भोसले व भीमरावदादा पाटील गटाची मैत्री संपुष्टात आली. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कऱ्हाड दक्षिणमध्ये ही महत्त्वाची घडामोड झाली. त्याचबरोबर उंडाळकरांच्या मार्गदर्शनाखालील कऱ्हाड तालुका विकास आघाडीने मोहिते- भोसलेंच्या रेठऱ्यात जिल्हा परिषदेसाठी उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे उंडाळकर-भोसलेंची छुपी युती आहे, की काय? अशी जोरदार चर्चा तालुक्‍यात सुरू झाली आहे. येळगाव गटातून अनेक दिवसांपासून चर्चा असलेली ॲड. उदयसिंह पाटील व ॲड. आनंदराव पाटील या बंधूंची लढत होणार हेही काल निश्‍चित झाले. त्यामुळे कऱ्हाड दक्षिणमधील लढती लक्षवेधी होणार आहेत. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावरही दिसून येणार आहे.  

सुपने व जखीणवाडीचे पाटील अपक्ष?
तांबवे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुपनेतील प्रकाश पाटील यांना उमेदवारी मिळेल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, पक्षाकडून तांबव्यातील शंकर पाटील व धनंजय ताटे यांना ‘एबी’ फॉर्म देण्यात आले. त्यामुळे सुपनेच्या पाटलांचा पत्ता कट झाला. त्यामुळे त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आमदार आनंदराव पाटील यांचे समर्थक आणि जखीणवाडीचे आदर्श सरपंच नरेंद्र नांगरे- पाटील यांचेही नाव काँग्रेसच्या ‘एबी’ फॉर्मच्या यादीत आले नाही. त्यामुळे त्यांनाही काँग्रेसकडून डावलण्यात आले. त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल करून बंडखोरीचा विचार केला आहे.

दोन ‘एबी’ फॉर्ममुळे अडचण 
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपकडून काही गट व गणामध्ये दोन व तीन उमेदवारांना पक्षाचे एबी फॉर्म दिले आहेत. त्यामुळे तेथे उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत इच्छुक उमेदवारच संभ्रमात आहेत. पक्षाच्या आदेशानुसार त्यातील काही जणांना उमेदवारी मागे घ्यावी लागणार आहे. पहिल्यांदाच पक्षाकडून अशा प्रकारे एबी फॉर्म देण्यात आल्याने उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याबाबत सर्वसामान्यात उत्सुकता आहे, तर काही ठिकाणी उमेदवारांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

Web Title: karad zp politics