करंजे व बलवडी (खा.) येथे दोन व्यक्ती दुचाकीसह गेल्या वाहून; अग्रणी नदीला पूर

दिलीप कोळी
Tuesday, 13 October 2020

खानापूर तालुक्‍यात रविवारी झालेल्या धो-धो पावसाने अग्रणी नदीला आलेल्या पुरात करंजे (ता. खानापूर) व बलवडी (खा.) येथे दोन व्यक्ती दुचाकीसह वाहून गेल्या.

विटा (जि. सांगली) : खानापूर तालुक्‍यात रविवारी झालेल्या धो-धो पावसाने अग्रणी नदीला आलेल्या पुरात करंजे (ता. खानापूर) व बलवडी (खा.) येथे दोन व्यक्ती दुचाकीसह वाहून गेल्या. सिराज मुलाणी (वय 46, रा. करंजे) असे वाहनू गेलेल्या एकाचे नाव असून दुसऱ्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नाही. या पावसात पिकांचे, मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे तालुक्‍यातील अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले. काही पूल निकामी झाले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. 

विटा-कराड रस्त्यावरील हायवे रस्त्याच्या कामाच्या ठिकाणचे पूल धुवॉंधार पावसामुळे वाहून गेल्याने वाहतूक बंद होती. पर्यायी मार्गाने काही काळ सुरू होती. तालुक्‍यातील अनेक मार्ग पुलावरून पाणी जात असल्याने काही तास बंद होते. 

रविवार दुपारच्या तुफानी पावसामुळे करंजे (ता. खानापूर) येथे अग्रणी नदीला आलेल्या पुरामुळे करंजे-तासगाव रोड वरील अग्रणी नदीवर असलेल्या पुलावरून सिराज मुलाणी (वय 46, रा. करंजे) हे दुचाकीवरून पुलावरून जात असताना वाहून गेले आहेत. तसेच बलवडी (खा.) येथेही अग्रणी नदीवरील पुलावरून दुचाकी वरून जात असताना एक व्यक्ती वाहून गेली आहे. त्याचे नाव समजले नसून, शोध कार्य सुरू आहे.

तसेच वाळूज येथे वीज पडून किरण महादेव देशमुखे यांच्या दोन म्हशी दगावल्या आहेत. दुपारपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अग्रणी नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे व नदीला पूर आलेला आहे. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी जात असल्याने लहान- मोठे अपघात व दुर्घटना घडल्याने संबंधितांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी केले आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At Karanje and Balwadi (Kha.) Two persons carried the last with a two-wheeler; Leading river floods